आकोट- संजय आठवले
आकोट : आगामी सण उत्सवांचे निमित्ताने पोलीस प्रशासन सज्ज झाले असून शहरात रुजू पोलिसांसह आकोट शहरात विशेष कामगिरी करिता दाखल झालेल्या मुंबई येथील दंगा नियंत्रण पथकाने शहरातून रूटमार्च काढला. याच दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी शांतता समितीची बैठक घेऊन गणेश शोभायात्रेत वेळेचे बंधन कसोशीने पाळण्याचे आवाहन केले आहे.
येत्या सप्ताहात मोठ्या धुमधडाक्यात साजर्या होणाऱ्या सण उत्सवांचे पार्श्वभूमीवर आकोट शहरात रॅपिड ॲक्शन फोर्स नवी मुंबईचे दंगा नियंत्रण पथक दाखल झाले आहे. आकोटची संवेदनशील पार्श्वभूमी पाहता पोलीस विभागाची आकोट शहरावर करडी नजर आहे. त्यामुळे आकोट शहरात विशेष करून मुंबई येथील दंगा नियंत्रण पथक पाठविण्यात आले आहे. कोणत्याही पद्धतीचा दंगा नियंत्रणात आणण्याचे खास प्रशिक्षण या पथकातील जवानांना देण्यात आले आहे.
शहरातील गणेशोत्सव शोभायात्रेचा मार्ग माहित करणेकरिता रॅपिड ॲक्शन फोर्सचे द्वितीय कमान अधिकारी इंद्रनील दत्ता, उप कमान अधिकारी शशिकांत राय, सहायक कमान अधिकारी संतोष कुमार यादव, निरीक्षक जीएस झारिया, कृपाचंद्र स्वामी, प्रीती सिंह, अफरोज अली, अजय कुमार सिंह यांचे सह १०८ जवान तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर, ठाणेदार तपन कोल्हे, पोलीस निरीक्षक गणेश पाचपोर, पोलीस उपनिरीक्षक सोनोने, शेख अख्तर, राजेश जवरे, चंद्रकांत ठोंबरे, वैभव तायडे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल देवकर यांचे सह शहर ठाण्यात रुजू पोलीस यांनी शहरातील सर्वच प्रमुख चौक व मुख्य रस्त्याने रूट मार्च काढला.
या दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आकोट शहर ठाणे येथे शांतता समितीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये शांतता समिती सदस्यांनी, शहरातील नागरिकांनी तथा गणेश मंडळांनी कायद्याला सहकार्य करण्याचे तथा मिरवणुकी दरम्यान वेळेचे बंधन पाळण्याचे आव्हान जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले आहे. या बैठकीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर, खकोट पालिका मुख्याधिकारी डॉक्टर नरेंद्र बेंबरे, ठाणेदार तपन कोल्हे यांचे सह शांतता समितीचे सदस्यांची उपस्थिती होती.