आकोट- संजय आठवले
आकोट तालुक्यातील ग्रामपंचायत जऊळका येथील उपसरपंचासहित सहा सदस्यांनी सरपंच सौ. उषा सतीश काठोळे यांचे विरोधात दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव पारित झाला आहे. त्याने सरपंच पायउतार झाले आहेत. हा अविश्वास प्रस्ताव दिनांक १०.२.२०२३ रोजी दाखल केला होता. सदस्यांना विश्वासात न घेणे, त्यांचेशी असभ्य वर्तन करणे, त्यांच्या पतीचे ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप करणे, ग्रामपंचायतचे प्रोसिडिंग बुक घरी नेणे असे आरोप सरपंचावर करण्यात आले होते. त्यावर ग्रामपंचायत जऊळका येथे दिनांक १६.२.२०२३ रोजी सुनावणी घेण्यात आली.
या सुनावणी दरम्यान उपरोक्त आरोप सिद्ध झाले. ही सुनावणी अध्यासी अधिकारी तथा प्रभारी तहसीलदार अक्षय रासने यांनी घेतली. त्यांचे मदतनिस म्हणून मंडळ अधिकारी संजय साळवे, तलाठी अस्मिता आवारे, सिद्धांत वानखडे, ग्रामपंचायत सचिव मंगेश रेखाते यांनी कामकाज केले. हा अविश्वास पारित झाल्यानंतर नियमाप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल, असे अक्षय रासने यांनी सांगितले. या प्रकाराने पायउतार झालेल्या सरपंच उषा सतीश काठोळे या न्यायालयात जाण्याची तयारी करीत आहेत.