आकोट – संजय आठवले
आकोट मतदार संघाकरिता नामांकन अर्ज दाखल करतेवेळी उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शोध घेतला असता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार ॲड. महेश उर्फ मनिष गणगणे हे सर्वात तरुण तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रकाश भारसाखळे हे सर्वात वृद्ध आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार कॅप्टन सुनील डोबाळे हे सर्वात शिक्षित तर भाजपाचे भारसाखळे चक्क मॅट्रिक नापास असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वय आणि शिक्षण या दोन्ही बाबतीत प्रकाश भारसाखळे हे अन्य उमेदवारांच्या तुलनेत पिछाडीस पडल्याचे दिसत आहे. त्यातच पार्सल असल्यावरही अट्टाहास करून आकोट मतदार संघात भारसाखळे उभे ठाकल्याने त्यांचे बाबत जनतेत रोष निर्माण होत आहे.
आकोट तेल्हारा मतदार संघात एकूण १९ लोकांचे नामांकन अर्ज वैध ठरले आहेत. त्यातील कोणी माघार घेतली ते ४ नोव्हेंबर नंतर कळणार आहे. मात्र या दरम्यान नामांकन अर्ज वैध ठरलेल्या आणि संभाव्य लढतीत असलेल्या भावी उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचा शोध घेतला, तेव्हा त्यांचे वय आणि शैक्षणिक पात्रता यांची माहिती मिळाली. त्यानुसार प्रकाश भारसाखळे वय ७२ वर्षे, शिक्षण दहावी नापास, कॅप्टन सुनील डोबाळे वय ५८ वर्षे शिक्षण बीई, राम प्रभू तराळे वय ४४ वर्षे, शिक्षण एचएससी, दीपक बोडखे वय ४८ वर्षे, शिक्षण बीए डीएड, महेश उर्फ मनीष गणगणे वय 40 वर्षे, शिक्षण बीए एलएलबी, ललित बहाळे वय ६३ वर्षे, शिक्षण बीएससी, सुभाष रौंदळे वय ५८ वर्षे, शिक्षण बीए प्रथम वर्ष, डॉक्टर गजानन महल्ले वय ५९ वर्षे, शिक्षण डीएचएमएस, दिवाकर बळीराम गवई वय ५३ वर्षे, शिक्षण बीए बीपीएड, लक्ष्मीकांत कौठकर वय ४१ वर्षे, शिक्षण एचएससी असल्याचे आढळून आले.
ह्या साऱ्यांची जुळवणी केली असता लक्षात येते कि, लक्ष्मीकांत कौठकार आणि रामप्रभू तराळे हे एच एस सी म्हणजे बऱ्यापैकी शिक्षित आहेत. तर प्रकाश भारसाखळे हे मात्र अगदीच अल्पशिक्षित आहेत. अन्य उमेदवार पदवीधर आहेत. त्यातही कॅप्टन सुनील डोबाळे हे सर्वाधिक शिक्षित तर प्रकाश भारसाखळे चक्क दहावी नापास आहेत. वयाचा हिशोब बघितला तर यामध्ये महेश उर्फ मनीष गणगणे हे सर्वाधिक तरुण वयाचे म्हणजे ४० वर्षे तर प्रकाश भारसाखळे हे ७२ वर्षांचे वृद्ध आहेत. कर्णबधिरता (कानाचा बहिरेपणा), उच्च रक्तदाब (बीपी), उच्च शर्करा (हाय डायबिटीस) ह्या व्याधींनी ते त्रस्त आहेत.
त्यामुळे आता त्यांनी कानात श्रवण यंत्र (ऐकू येण्याचे मशीन) बसविले आहे. तर अन्य व्याधींकरिता त्यांना औषधोपचार सुरू आहे. त्यातच ते आकोट मतदार संघाकरिता दर्यापूरचे पार्सल आहेत. त्यांची ही स्थिती पाहता केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी त्यांना यावेळी थांबून विश्राम करण्याचा उपदेश केला. परंतु आमदारकीच्या अति हव्यासापोटी भारसाखळे यांनी गडकरींचा सल्ला धुडकावला. त्यातच आकोट तेल्हारा मतदारसंघातील भाजप नेते, कार्यकर्ते यांनी भारसाखळे यांचे उमेदवारीला प्रचंड विरोध केला. आणि यावेळी स्थानिक उमेदवार देण्याचा भाजप श्रेष्ठींकडे आग्रह धरला.
वास्तविक भारसाखळे यांचे प्रकृती अस्वास्थ्य, वाढते वय, नाजूक शारीरिक क्षमता, त्यांचे अल्पशिक्षण आणि त्यांचे पार्सल असणे हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच ठाऊक आहे. शारीरिक दुर्बलतेमुळे भारसाखळे हे फडणवीसांसमोरच त्यांचे भाषणादरम्यान चक्क मंचावरच डाराडूर झोपले होते. तरीही गडकरी यांचा सल्ला आणि आकोट व तेल्हारा येथील भाजप कार्यकर्त्यांचा आग्रह डावलून देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक उमेदवारीचा मुद्दा मोडीत काढला. आणि वयोवृद्ध, आजारी, अल्पशिक्षित व पार्सल असलेल्या भारसाखळे यांना आकोटची उमेदवारी बहाल केली. मात्र असे करतेवेळी त्यांनी ही उमेदवारी बराच काळ रोखून धरली होती.
ही उमेदवारी रोखून धरण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे कि, नाराज कार्यकर्त्यांना बंडखोरीची सवड मिळू नये आणि भारसाखळे यांचेकडून अधिकाधिक पक्ष निधी मिळावा याकरिता त्यांची उमेदवारी रोखण्याचे नाटक केले गेले. सोबतच ही उमेदवारी दिल्याने आकोट मतदार संघातील निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांचा अपमान झाला असून आकोट आणि तेल्हारा तालुक्यातील भाजप परिवारात एकही माणूस आमदार होण्याचे लायकीचा नाही असा संदेश फडणवीस यांनी दिल्याची चर्चाही मतदारसंघात सुरू आहे. भाजप कार्यकर्त्यांशी गेला काळ नेहमीच फटकून वागणारे भारसाखळे यांची पाठराखण चक्क नेतृत्वानेच केल्यामुळे भारसाखळे येणाऱ्या काळात कसे वागतील? हा प्रश्नही भाजप परिवारात रुंजी घालत आहे.
अशा स्थितीत “पार्सल परत करा.. स्थानिक उमेदवार स्वीकारा…” हा मंत्र मतदार उच्चारित आहेत. त्यातच एका भाजप कार्यकर्त्याच्याच चार ओळींनी मोलाची भर घातली आहे.
“स्थानिकांमध्ये कुणीच नाही फडणवीसांना स्वीकार
म्हणून लादला बाहेरचा वृद्ध अन आजारी उमेदवार
पण आता फैसला करतील जागरूक मतदार
ठेवावा जुना की आणावा कुणी नवा दमदार”