आकोट – संजय आठवले
आकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाशी जुळणाऱ्या रस्त्यांच्या रेंगाळणाऱ्या कामांबाबत आकोट विधीज्ञ संघाने जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने ठराव पारित केला आहे. सोबतच या संदर्भात कारवाई करण्याचे सर्वाधिकार आकोट विधीज्ञ संघाचे अध्यक्ष एडवोकेट सुरेंद्र पोटे यांना देण्यात आले आहेत. हा ठराव पारित झाल्यानंतर आता या रस्त्यांबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे.
सद्यस्थितीत आकोट शहरात येणाऱ्या सर्वच मार्गांची अतिशय दुर्दशा झालेली आहे. त्यातील शहराबाहेरचा आकोट अकोला हा मार्ग कंत्राटदाराची नालायकी व राजकीय नेत्यांची मृत इच्छाशक्ती यांचा वैश्विक नमुना बनलेला आहे. सोबतच शहरातील रेल्वे पूल ते नाल्यापर्यंतचा मार्गही काहीच कमी नाही. हा मार्ग शहराच्या मुख्य बाजारपेठेतून जातो. याच मार्गाला बस स्थानक, रेल्वे स्थानक यांच्याकडे जाणारा मार्ग जुळलेला आहे. या मार्गालागतच पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,नगरपालिका, आठवडी बाजार, सर्व प्रकारची व्यापारी प्रतिष्ठाने, बँका, दवाखाने, न्यायालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय हे आहेत. त्यामुळे हा मार्ग अगदी सुस्थितीत हवा. विशेष म्हणजे या मार्गाचे काम सन २०१५-१६ मध्ये सुरू झालेले आहे. परंतु अद्यापही हा रस्ता अपूर्णावस्थेतच आहे. करण्यात आलेले कामही तूट फूट झालेले आहे. विशेष म्हणजे या कामाचा कंत्राटदार संतोष चांडक याची जन्मभूमी आकोटच आहे. सारे म्हणतात की, “गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणिन आरतीला हे सूर्य चंद्र तारे.” परंतू चांडकचे वर्तन नेमके ह्या काव्यपंक्तींच्या विरोधी आहे. विशेष म्हणजे ह्या मार्गाचा दोष सिद्धता कालावधी संपलेला आहे. त्यामुळे ह्या रस्त्याच्या बकालपणाकरिता त्याला दोषी धरता येणार नाही. आणि हे सारे घडले आहे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांमुळे. त्यांनी चांडकला ढील दिली आमदार भारसाकळेंमुळे. याचे कारण म्हणजे चांडक हा आमदार भारसाकळे यांचा परम प्रिय कंत्राटदार आहे. या साऱ्यांचा परिपाक म्हणजे या रस्त्याची बकालता. ज्याचे दुष्परिणाम आकोटकर भोगीत आहेत.
दुसरा मार्ग आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मच्छी बाजारातून अंजनगाव कडे जाणारा हा राज्य महामार्ग आहे. परंतु हा मार्ग अतिशय भिक्कार मार्ग बनला आहे. या रस्त्याचे ही काम संतोष चांडकच करीत आहे. हा मार्गही निकृष्ट कामांचा उत्तम नमुना आहे. राज्य महामार्ग असल्याने हा मार्ग तितक्या तोडीचा निर्माण व्हायला हवा. मात्र गाव रस्ता असल्यागत या मार्गाचे काम सुरू आहे. हे काम तीन चार वर्षापासून सुरू आहे. या कामावरही सार्वजनिक बांधकाम विभाग मेहरबान आहे.
तिसरा मार्ग आहे कलदार चौकातून हिवरखेड कडे जाणारा. हा मार्ग पॅचेस लावून बेजान झाला आहे. तर दुसरीकडे नगरपालिका बेभान आहे. हे मार्ग अतिशय बिकट असल्याने या मार्गांवर पथदिवे उभारणे अतिशय गरजेचे आहे. जेणेकरून वाहनधारक व पादचाऱ्यांना रस्त्यातील अडथळे लक्षात यावेत. मात्र पालिकेने या मार्गावर अनेक ठिकाणी आवश्यक असूनही पथदिवे लावलेले नाहीत. मात्र या साऱ्या संदर्भात कोणीच काही बोलावयास तयार नाही. त्यामुळे नागरिकांची अगतिकता पाहून अखेर वकील संघानेच ह्या बाबतीत पुढाकार घेऊन कायदेशीर लढ्याचा निर्णय घेतला आहे. त्या लढ्याची पूर्वतयारी म्हणून आकोट विधीज्ञ संघाने जनहित याचिका दाखल करण्याकरिता ठराव पारित केला आहे. याबाबतीत कराव्या लागणाऱ्या संपूर्ण प्रक्रियेचे सर्वाधिकार आकोट विधीज्ञ संघाचे अध्यक्ष एडवोकेट सुरेंद्र पोटे यांना देण्यात आले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता संघाकडून या मार्गाची माहिती गोळा करणे सुरू झालेले आहे. याचिकेमध्ये कंत्राटदार, संबंधित विभाग, पालिका मुख्याधिकारी यांना प्रतिवादी बनविण्यात येणार आहे.