Sunday, December 22, 2024
Homeराज्यआकोट खविस निवडणूक रणधुमाळीस प्रारंभ…२० जागांकरिता ३९ उमेदवार रिंगणात…एक अविरोध… सहकार पॅनल...

आकोट खविस निवडणूक रणधुमाळीस प्रारंभ…२० जागांकरिता ३९ उमेदवार रिंगणात…एक अविरोध… सहकार पॅनल ने दबाव तंत्र वापरल्याचा आरोप…

आकोट – संजय आठवले

आकोट तालुका खरेदी विक्री समिती निवडणुकीचा बिगुल फुंकला गेला असून निवडणुकीच्या प्रचारास प्रारंभ करण्यात आला आहे. समीतीच्या २० संचालकांकरिता एकूण ३९ उमेदवार रिंगणात आहेत. तर एक उमेदवार अविरोध निवडून आला आहे.

या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहकार पॅनलच्या धुरीणांनी प्रतिस्पर्धी शेतकरी पॅनलचे कार्यकर्ते व उमेदवारांवर दबाव तंत्रांचा वापर करून या पॅनलला बरीच क्षती पोहोचविण्याचा प्रयास केल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे.

आकोट तालुका खरेदी विक्री समितीवर गत अनेक वर्षांपासून सहकार पॅनलचा दबदबा राहिलेला आहे. तो कमी करणेकरिता यावेळी प्रतिस्पर्धी शेतकरी पॅनल ने पूर्ण तयारी केली आहे.

या संस्थेवर संलग्न सहकारी संस्था या घटकांमधून १० संचालक, वैयक्तिक मतदारसंघ घटकांमधून ६ संचालक, इतर मागासवर्गीय १, विमुक्त व भटक्या जाती १, महिला राखीव २, अनुसूचित जाती जमाती १, असे एकूण २१ संचालक निवडून दिले जातात. त्यानुसार दोन्ही पॅनल कडून एकास एक उमेदवार देण्याचा प्रयास केला गेला आहे.

परंतु या प्रयत्नांमध्ये सहकारी पॅनलच्या धुरकऱ्यांनी शेतकरी पॅनलच्या कार्यकर्ते व उमेदवारांवर दबाव आणल्याचा आरोप केला जात आहे. सहकार क्षेत्रात जबर पकड असलेल्या या सहकार नेत्यांनी शेतकरी पॅनलला उमेदवार मिळून न देण्याकरिता बराच प्रयास केल्याचे शेतकरी नेते बोलत आहेत.

या दबावाचा परिणाम म्हणून वैयक्तिक मतदारसंघात शेतकरी पॅनल ६ ऐवजी ५ च उमेदवार उभे करू शकले आहे. तर दुसरीकडे अनुसूचित जाती जमाती घटकांमधील शेतकरी पॅनलच्या उमेदवारावर प्रचंड दडपण आणल्याने त्याने ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे या घटकामधून सहकार पॅनलचे विजेंद्र प्रल्हाद तायडे यांचा अविरोध विजय झाला आहे.

परिणामी आता २० जागांवर निवडणूक होत असून त्याकरिता एकूण ३९ उमेदवार निवडणूक मैदानात उतरलेले आहेत. त्यामध्ये सहकार पॅनल कडून संलग्न सहकारी मतदारसंघाकरिता रमेश श्रीराम हिंगणकर, हिदायतुल्ला बरकतउल्ला खाॅं पटेल, सुभाष रामकृष्ण मगर, संतोष मनोहरराव पुंडकर, अनोख दिगंबरराव राहणे, मनोहर मोतीराम सावरकर,

कुलदीप वामनराव भिसे, सुरेंद्र नारायणराव बकाल, हरिभाऊ गजाननराव मानकर, वैयक्तिक सभासद मतदारसंघातून शेषराव लक्ष्मणराव वसू, दयाराम काशीराम धुमाळे, दीपक विश्वनाथ पवार, श्रीकृष्ण राजाराम रोठे, त्र्यंबकराव गुलाबराव मंगळे, दत्तात्रय श्रीराम तळोकार, इतर मागासवर्गीय मतदार संघातून अरुण प्रल्हादराव जवंजाळ,

विमुक्त जाती/ भटक्या जमाती मतदारसंघातून विजय गुलाबराव इंदोरे, महिला राखीव मधून सौ. वृषाली दत्तात्रय होळंबे, सौ. सविता सदाशिव पाटकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर अनुसूचित जाती/ जनजाती या जागेवर या पॅनलचे विजेंद्र प्रल्हाद तायडे हे अविरोध निवडून आलेले आहेत.

या विरोधात शेतकरी पॅनलनेही आपले योद्धा मैदानात उतरविले आहेत. त्यामध्ये संलग्न सहकारी संस्थांमधून मोहन गुलाबराव इंगळे, संतोष हरिश्चंद्र गावंडे, गजानन माधवराव आवारे, सौ. अरुणाबाई उत्तम सानप, दिनकरराव महादेवराव जायले, किशोर बळीराम आवारे, भानुदास उत्तमराव बानेटकर, राजेंद्र शंकरराव पोतले, दादाराव विष्णू पेठे,

विलास काशीराम साबळे, इतर मागासवर्गीय मधून मनोज उत्तमराव खंडारे, महिला राखीव मधून सौ. लताबाई जयदेवराव साबळे, सौ. वंदना विठ्ठल शिंदे, विमुक्त व भटक्या जातीमधून संदीप निळकंठराव उगले, वैयक्तिक मतदार संघामधून विजय भास्करराव महाले, हेमंत धोंडोपंत चिंचोळकर, डॉक्टर गजानन शेषराव महाले, विलास पुरुषोत्तम शेंडे, डॉक्टर प्रमोद रामेश्वर चोरे यांचा समावेश आहे.

हे मतदान दिनांक ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे दोन्ही पॅनल कडून प्रचाराचा झंजावात सुरू झाला आहे. यामध्ये आपला दबदबा अबाधित ठेवण्याचे आव्हान सहकार पॅनल समोर आहे. तर सहकार पॅनलला खाली खेचून खरेदी विक्री समितीवर आपला परचम फडकविण्याचा विडा शेतकरी पॅनलने उचलला आहे.

त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच झुंज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु सहकार पॅनलचे कप्तान साम-दाम-दंड-भेद नितीनिपूण आहेत. तर शेतकरी पॅनलचे पायलट हे सरळ नीतीधारी आहेत. त्यामुळे सहकार पॅनलशी भिडतांना शेतकरी पॅनलला अतिसतर्कता बाळगण्याची गरज आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: