Wednesday, November 13, 2024
Homeराज्यआकोट | परतीच्या पावसाचा तालुक्यात हैदोस...शेकडो एकर शेती पाण्याखाली...हातात तोंडाशी आलेली पिके...

आकोट | परतीच्या पावसाचा तालुक्यात हैदोस…शेकडो एकर शेती पाण्याखाली…हातात तोंडाशी आलेली पिके संकटात…पोपटखेड धरणाचे दोन दरवाजे उघडले…

अकोट- संजय आठवले

पावसाळ्याच्या मध्यंतरी आकोट तालुक्यातील खारे पाणी पट्ट्यात लोकांच्या नाकी नऊ आणल्यानंतर आता परतीच्या पावसाने तालुक्यातील हरितपट्ट्यात हैदोस घालणे सुरू केले असल्याने या भागातील शेकडो एकर शेती जलमय झाली असून पुराने नदी नाले तुडुंब भरले आहेत. परिणामी अनेक गावांचे एकमेकांशी व शहराशीही अनेक तास संपर्क तुटत आहे. दरम्यान पावसामुळे पाण्याची आवक वाढत असल्याने पोपटखेड धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.

यंदाच्या पावसाळ्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने हा काळ पावसाचा परतीचा काळ मानला जातो. परतीचा हा पाऊस दरवेळी ओलीसूकीचा खेळ खेळत जात असतो. मात्र यावेळी परतीच्या या पावसाने अतिशय रौद्ररूप धारण केल्याचे दिसत आहे. यावर्षी पावसाळ्याच्या मधल्या काळात पावसाने आकोट तालुक्यातील खारे पाणी पट्ट्यात येणाऱ्या चोहट्टा आणि कुटासा या दोन महसूल मंडळातील गावांचे जबर नुकसान केले. त्या नुकसानीचा हिशेब करून शासनाची मदत आपादग्रस्तांपर्यंत पोहोचत नाही तोच, आता परतीच्या या पावसाने तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी हैदोस घालणे सुरू केले आहे.

गत नऊ ऑक्टोबर पासून ढगफुटी सदृश्य कोसळणाऱ्या या पावसाने शेतकरी तथा नागरिक यांचे तोंडचे पाणी पळवलेले आहे. या भागातील नेव्होरी बू. नेव्होरी खू., उमरा, एदलापूर, शिवपूर, कासोद, बोर्डी, खैरखेड, मकरमपूर या परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली आली आहे. परिणामी या भागातील हातातोंडाशी आलेली पिके पूर्णतः संकटात सापडली आहेत. त्यामुळे शासन, व्यापारी, मजूर यांच्याशी संघर्षरत असलेला शेतकरी वर्ग सालाबादाप्रमाणे यंदाही निसर्गाच्या कचाट्यात सापडला आहे. या पावसाने केवळ शेतकरीच बाधित झाले नसून गावात घुसलेल्या पाण्याने अन्य ग्रामस्थांच्या राहत्या घरांनाही धोका निर्माण केला आहे. गावागावातील अनेक वस्त्या पाण्याने वेढल्या गेल्या आहेत. नद्या नाले अगदी तुडूंब भरून त्यांचे पूलांवरूनही पाणी वाहत आहे. त्याने फुल खचले जात आहेत.

त्यामुळे अनेक गावांचा एकमेकांशी आणि शहराशी चार चार पाच पाच तासाकरिता संपर्कात तुटत आहे. समाधानाची बाब म्हणजे या कालावधीत कोणत्याही गावात जीवित हानीचे वृत्त नाही. ह्या धुवॉंधार पावसाने पाण्याची आवक सतत वाढत असल्याने पोपटखेड धरणाचे पातळीतही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. हे धरण असलेल्या खाई नदीच्या काठाने यावेळी कोणत्याही नुकसानीचे वर्तमान कळाले नाही. परंतु आकोट शहराचे पूर्वेकडून वाहणाऱ्या मोहाडी नदीने मात्र मोठा उच्छाद मांडला आहे. त्याचा फटका या नदीकाठच्या आकोट शहरातील वस्तीलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे.

महसूल कॉलनी, फरिया नगर, गाजी प्लॉट या परिसरातील घरांमध्ये प्रचंड पाणी घुसले. त्याने मोठे नुकसान झाले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरीब वस्ती असल्याने घरांच्या मोडतोडीसह या घरातील भांडीकुंडीही पुराने पाण्यात वाहून गेली आहेत. यंदाच्या या पावसाने तालुक्यातील सर्व विक्रम मोडीत काढले असून असा पाऊस आपण कधीच अनुभवला नसल्याचे उमरा, बोर्डी, शिवपुर, कासोद,नेव्होरी, खैरखेड, मकरमपूर या भागातील वृद्ध बोलत आहेत. आजवरच्या अनेक आपत्तींचा धिराने सामना करणारे ही यावर्षीच्या पावसाने धास्तावलेले आहेत. शासकीय यंत्रणांना नुकसानीची मोजदाद करण्याकरिता जाण्यासही पाऊस सवड देत नसल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: