Monday, December 23, 2024
Homeराज्यआकोट जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी फॅक्टरी संचालकांची परीक्षा…१,८०० मतदार बजावणार मताधिकार…

आकोट जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी फॅक्टरी संचालकांची परीक्षा…१,८०० मतदार बजावणार मताधिकार…

आकोट- संजय आठवले

आकोट जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी फॅक्टरी संचालक पदांकरिता दिनांक २६ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून या निवडणुकीत एकूण १,८०० मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. आकोट तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील ही प्रतिष्ठेची निवडणूक असून थोड्याच कालावधीत होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची ही निवडणूक ‘लिटमस टेस्ट’ मानली जात असल्याने या निवडणुकीत सहकार आणि शेतकरी या दोन्ही पॅनलची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

या निवडणुकीत विविध प्रवर्गाच्या एकूण ६ मतदारसंघातून २१ संचालक निवडले जाणार आहेत. त्याकरिता सहकार व शेतकरी पॅनलने आपापल्या पॅनल मधील दिग्गजांना उमेदवारी दिलेली आहे. या निवडणुकीकरिता शेतकरी पॅनलचे चिन्ह गॅस सिलेंडर तर सहकार पॅनलचे चिन्ह कपबशी आहे. यातील वैयक्तिक मतदार संघाच्या ९ संचालकांकरिता शेतकरी पॅनल तर्फे रवींद्र अरबट, गणेश इंगळे, राजकुमार खंडेराय, मनोहर गाढे, शंकर डिक्कर, गजानन पुंडकर, संजय मानकर, अतुल सोनखासकर, व सतीश हाडोळे यांना तर सहकार पॅनल तर्फे अभिजीत अग्रवाल, देविदास कराळे, मनोहर गये, नंदकुमार थारकर, रामदास थारकर, राजेश नागमते, निलेश उर्फ बिट्टू पाचडे, राजेश पुंडकर व निलेश हांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सहकारी संस्था मतदार संघातून ७ संचालकांकरिता सहकार पॅनलने भाऊराव काळंके, ताहेरउल्लाखाॅं पटेल, ललित बहाळे, वामनराव बाणेरकर, मनोज बोंद्रे आणि सुभाष वानखडे यांना तर शेतकरी पॅनलने अनंतराव गावंडे, ज्ञानेश्वर ढोले, डॉ. सुरेश रावणकार, संजय रेळे, आणि सौ. भारतीताई वडाळ यांना मैदानात उतरविले आहे. अनुसूचित जाती जमाती या मतदार संघातून एका संचालकाकरिता शेतकरी पॅनलचे संदीप आग्रे तर सहकार पॅनलचे गजानन डांगे उभे ठाकले आहेत. महिला राखीव मतदार संघाच्या २ संचालकांकरिता सहकार पॅनल तर्फे सौ.रमाताई गावंडे व सौ. मंगला पांडे तर शेतकरी पॅनल तर्फे सौ. पल्लवी कोकाटे आणि श्रीमती सुरेखा लबडे निवडणूक रिंगणात आहेत. इतर मागासवर्गीय मतदार संघातून एका संचालकाकरिता शेतकरी पॅनल तर्फे प्रदीप उर्फ बबलू कडू तर सहकार पॅनल तर्फे पुरुषोत्तम मुरकुटे यांची लढत आहे. विशेष मागास प्रवर्गातून एका संचालकाकरिता सहकार पॅनल तर्फे कैलास कवटकार तर शेतकरी पॅनल तर्फे काशीराम साबळे यांचे मध्ये रस्सीखेच आहे.

आज वरचा इतिहास पाहू जाता कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका खरेदी विक्री आणि सहकारी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी या तिन्ही संस्थांवर सहकार पॅनलचाच दबदबा कायम राहिलेला आहे. बाजार समितीवर काही काळ बदल झाला. परंतु सहकारी जिनिंग प्रेसिंग आणि खरेदी विक्री या संस्था मात्र कायम सहकार पॅनलच्याच मूठीत राहिल्या. त्यामुळे यावेळी शेतकरी पॅनलने सहकार पॅनलच्या या मक्तेदारीला या निवडणुकीच्या निमित्ताने कडवे आव्हान देण्याचा निर्धार केला आहे. त्याकरिता शेतकरी पॅनलची मंडळी अतिशय जोमाने संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढीत आहेत.

सहकार पॅनलही तितक्याच जोमाने आपला गड राखण्याकरिता प्रयत्नशील आहे. आजवर सहकार पॅनलचे नेते केवळ सांगावा धाडून मोहिमा फत्ते करीत आले आहेत. मात्र आताच्या बदलत्या काळात शेतकरी पॅनलच्या कडव्या आव्हानाला तोडीस तोड उत्तर देण्याकरिता सहकार पॅनलचे दिग्गज थेट मतदारांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र आहे. सारांश, दोन्ही पॅनलने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनविली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे साहजिकच या निवडणुकीत अतिशय चुरस निर्माण झाली आहे. अशा अटीतटीच्या वातावरणात कूणाचे अस्तित्व टिकते याचा फैसला १,८०० मतदार करणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: