आकोट- संजय आठवले
आकोट लोहरी मार्गालगतच्या आकोट पालिका हद्दीत येणाऱ्या जोशीवाडी लेआउट मधील रस्त्यावर अतिक्रमण करून बांधण्यात आलेली भिंत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर पालिकेने पाडून टाकली आहे. ही भिंत धराशायी झाली असली तरी तिच्या उदरात दडलेल्या चुरस व चमत्कारिक कथांचे मात्र पारायण होताना दिसत आहे. ही भिंत पडल्याने एक अध्याय संपला असला तरी लवकरच दुसरा अध्याय सुरू होण्याचे संकेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, आकोट लोहरी मार्गालगतच्या जोशी वाडी या परिसरातून शेतात जाणाऱ्या एका रस्त्यावर एका भूखंड धारकाने भिंत बांधली. त्यामुळे या लेआउटच्या पलीकडील शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा मार्ग बंद झाला. ह्या लेआउटलगत शेत असलेल्या एका शेतकऱ्याने रस्त्याकरिता आपल्या शेताला चिकटूनच असलेला ह्या लेआउट मधील एक भूखंड विकत घेतला. परंतु त्याचे मालकीचे भूखंडातूनही त्याला जाऊ देण्यात येत नव्हते. या शेताला लागूनच असलेल्या शेतकऱ्यांचीही तीच समस्या होती. त्यातच या शेतकऱ्यांनी आपली शेतीही अकृषीक करण्याचा बेत केला. परंतु हा रस्ता बंद झाल्याने या शेतकऱ्यांची मोठी गोची झाली.
त्यामुळे रस्त्यात भिंत बांधण्यात आल्याची तक्रार पालिका मुख्याधिकारी यांचेकडे करण्यात आली. त्यावर नियमानुसार कार्यवाही करून मुख्य अधिकाऱ्यांनी संबंधितांना पालिकेची नोटीस दिली. त्यात भिंत पाडून टाकणेबाबत सूचित केले गेले. परंतु आम्ही ग्रामपंचायत जळगाव नाहाटेच्या हद्दीत असून त्यांचेकडून बांधकाम परवानगी घेतल्याचा अतिक्रमणकर्त्याने दावा केला. सोबतच त्याचे पत्नीने पालिका मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे व बांधकाम अभियंता करण अग्रवाल यांची नावे आकोट शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.
सदर अतिक्रमण धारकाने काहीही दावा केला असला आणि कोणतीही पोलीस तक्रार केली असली तरी सदर लेआउट हे आकोट पालिका हद्दीतील असल्याने पालिकेने नियमानुसार कार्यवाही मात्र सुरूच ठेवली.
मजेदार बाब म्हणजे या कार्यवाही मागील कारणाला एक सुरस कथा चिकटली आहे. ती अशी कि, या जोशी वाडीला लागून असलेल्या चार-पाच शेतकऱ्यांनी शहरातील भूखंडाचे उलटेसिधे व्यवहार करणाऱ्या एका टोळीशी संपर्क केला. या टोळीतील काही जणांचा मुख्याधिकारी बेंबरे यांचेशी मोठा सलोखा आहे. या शेतकऱ्यांनी या सलोखाधारकांच्या माध्यमातून सदर भिंत पाडणे बाबत मुख्याधिकारी बेंबरे यांचेशी लेनदेन केलेली आहे. या कथेतील खरे खोटेपणा यातील संबंधितांनाच ठाऊक.
यातच ही भिंत बांधून रस्ता अडविण्यामागेही एका कथेचे चर्चित चर्वण होत आहे. ते असे कि, जोशी वाडीचे अकृषीकधारक यांना बाजूची शेती विकत घ्यायची आहे. तेथेही निवासी भूखंड पाडायचे आहेत. परंतु त्यांना ही शेती आपल्या दरावर हवी आहे. त्याकरिता त्या शेतकऱ्यांचे शेताचे पोच मार्गावर ही भिंत बांधून त्यांचा मार्ग बंद केला गेला आहे. म्हणजे मार्ग बंद केल्याने त्रासून हे शेतकरी आपणास हव्या त्या किमतीला शेती विकतील असा जोशींचा होरा आहे. यातही किती तथ्य आहे, तेही या संबंधितांनाच ठाऊक. परंतु काहीतरी जळाल्याखेरीज धूर निघत नाही हेही शाश्वत वास्तव आहे.
अशा स्थितीत अखेर ३० जून रोजी पालिका अतिक्रमण तोडू पथकाने सकाळी साडेनऊ वाजताच घटनास्थळी धाव घेतली. आणि कुणाला काही कळण्याचे आत ही भिंत जमीनदोस्त केली. परंतु या भिंतीने धराशायी होता होता अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रश्न कोणते रूप धारण करतात त्याची उत्सुकता आहे.