आकोट- संजय आठवले
कधीकाळी राज्य शासनाचा स्मार्ट व्हिलेज पुरस्कार पटकाविणाऱ्या आकोट तालुक्यातील उमरा ग्रामपंचायत मध्ये अतिशय भ्रष्टाचारी व गैर कारभार चालला असल्याचा आरोप करून उमरा येथील प्रतिष्ठित नागरिकांनी पंचायत समिती समोर आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.
आकोट तालुक्यातील उमरा ग्रामपंचायत ने सन २०२० – २१ मध्ये स्मार्ट व्हिलेज हा ५० लक्ष रुपयांचा पुरस्कार पटकाविला होता. अर्थात हे गाव स्मार्ट व्हिलेज ठरण्याकरिता गावातील लहान थोरांनी श्रम केल्यानेच हा पुरस्कार मिळाला होता. मात्र त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने ‘डर्टी’ कारभार सुरू केल्याची ओरड होत आहे. या पुरस्कारातून ग्रामपंचायतने ७.७५ लक्ष रुपयांना घंटागाडी खरेदी केली. ४ लक्ष रुपयांच्या कचराकुंड्या खरेदी केल्या. या संदर्भात गावातून झालेल्या तक्रारीवर चौकशी झाली. त्यामध्ये ७.७५ लक्ष किमतीची घंटागाडी ५.७५ लक्ष रुपये किमतीची तर प्रति ६ हजार 356 रुपये प्रमाणे खरेदी केलेली कचराकुंडी ही केवळ ३ हजार ८४६ रुपये मूल्याची असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यातच गावात ठेवलेल्या कचऱ्या कुंड्या व खरेदी केलेल्या कचराकुंड्या यांचा ताळमेळच लागत नसल्याचेही निष्पन्न झाले. तसेच ही खरेदी करताना प्रशासनाने ठरवून दिलेल्या प्रक्रियेचे मुळीच पालन केले गेले नसल्याचा ठपकाही ठेवण्यात आला.
या सोबतच कोरोना काळात चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने लक्षावधी रुपयांचे साहित्य खरेदी केले. त्या संदर्भातही तक्रारी झाल्या. त्याचीही चौकशी करण्यात आली. त्यावेळी चौदाव्या वित्त आराखड्यात या साहित्याचा समावेशच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. त्यासोबतच या खरेदीकरिता ग्रामपंचायतने कोणताच ठराव घेतला नाही.जाहीर निविदा बोलावल्या नाहीत. ई-टेंडर प्रणालीचा वापरही केला नाही. या खरेदी संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांचे निर्देशांचे जराही पालन केले नाही, असे चौकशीत आढळून आले. चौकशीत हे सारे निष्पन्न झाले असले तरी त्या संदर्भात संबंधितांकडून वसुली अथवा त्यांच्यावर अन्य कोणतीही कार्यवाही मात्र करण्यात आलेली नाही. असे आरोप करून रवींद्र भाऊदेव इंगळे, राजेंद्र सदाशिव मावलकर, प्रमोद रामभाऊ खवले व संदीप बाळकृष्ण सावरकर यांनी पंचायत समिती समोर आमरण उपोषण प्रारंभ केले आहे. गावात सुरू असलेली पाणीटंचाई दूर करून स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणीही उपोषणकर्त्यांनी केली आहे.