आकोट – संजय आठवले
आकोट तालुक्यातील ग्राम दिनोडा येथील बापलेकावर प्राण घातक हल्ला करून त्या दोघांनाही गंभीर जखमी करणाऱ्या वरुड जऊळका येथीलआरोपीला आकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला आहे.
या प्रकरणाची हकीगत अशी कि, ग्राम दिनोडा येथील फिर्यादी सौ. सुशीला खेडकर या महिलेने पोलीस स्टेशन दहीहांडा येथे फिर्याद दाखल केली. त्यानुसार फिर्यादीचा पती व मुलगा हे ग्राम दिनोडा येथील त्यांचे राहते घराचे दारात उभे होते. त्यावेळी आरोपी सुधाकर केंद्रे, चैताली केंद्रे दोघेही राहणार दिनोडा व नागेश विठ्ठलराव घुगे राहणार वरुड जऊळका यांनी त्या बापलेकांना जीवे मारण्याचे उद्देशाने कुऱ्हाडीने व काठीने त्यांचेवर हल्ला केला. सुधाकर केंद्रे याने आपल्या मुलाचे कानाचा चावा घेऊन तो तोडला.
या फिर्यादीवरून दहीहांडा पोलिसांनी भादवी ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. यातील आरोपी नागेश घुगे हा जामिनावर सुटल्यास अशाच प्रकारचे गुन्हे करण्याची शक्यता आहे. साक्षीदारांवर दबाव आणण्याचीही शक्यता आहे. गुन्हा दाखल झाल्यावर तो फरार झालेला आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप अपूर्ण आहे.
त्यामुळे आरोपीची पोलीस कोठडीत विचारपूस होणे गरजेचे आहे. म्हणून त्याचा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला. त्यावर आरोपीचे वकिलांनीही व्यक्तिवाद केला. दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आकोट जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.