आकोट – संजय आठवले
Akot : दोन भाऊ व त्यांची दोन अपत्ये आपल्या परिवाराचे मदतीने ठार करणाऱ्या बहिणीच्या प्रकरणात आकोट न्यायालयाने पुन्हा आपला निकाल राखून ठेवला असून येत्या १४ मे रोजी अंतिम निकालाची तारीख मुक्रर केली आहे. ह्या गुन्हेगारांना न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील जी. एल. इंगोले यांनी जोरदार युक्तीवादासह सर न्यायालयाच्या ६ निवाड्यांचे दाखले देत गुन्हेगारांकरिता फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. त्यांच्या या जोरदार युक्तिवादाने या प्रकरणातील शिक्षेसंदर्भात वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
वाचकांना स्मरतच असेल कि, तेल्हारा तालुक्यातील मालपुरा येथे शेतीचे वादातून सख्ख्या बहिणीने आपले परिवाराचे मदतीने सख्खे दोन भाऊ व तारुण्यात पदार्पण करणाऱ्या त्यांच्या दोन मुलांना ठार केले होते. त्यांचे वरील आरोप शाबीत झाल्यानंतर त्यांच्या शिक्षेचा निवाडा ३ मे रोजी निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार ह्या गुन्हेगारांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी सरकारी वकील जी. एल. इंगोले यांनी जोरदार युक्तिवाद करून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
ही दुर्मिळात दुर्मिळ ठरणारी घटना असल्याचे त्यांनी न्यायासनासमोर स्पष्ट केले. आपले कथनाचे पुष्ठ्यर्थ त्यांनी सरन्यायालयाचे ६ निवाडे न्यायासनासमोर प्रस्तुत केले. पुढे त्यांनी म्हटले कि, मृतक हे निशस्त्र होते. परंतु मारेकरी मात्र शस्त्र सज्ज होते. मृतांच्या गळ्यावरील शस्त्राचे वार पाहून स्पष्ट होते कि, मारेकऱ्यानी त्यांना संपविण्याचे उद्देशानेच हे वार केलेले आहेत. त्यानंतर मयतांच्या शरीरावरील अन्य वार बघता आणि मयतांचे छिन्नविछिन्न केलेले मृतदेह बघता मारेकऱ्यांनी अतिशय निर्घृनपणे आणि क्रूरतेने वार केल्याचे दिसून येते.
या हत्याकांडात मृत झालेली दोन मुले ही बालका समानच होती. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या ह्या मुलांनी जगच पाहिले नव्हते. तर अन्य दोघे हे घरातील कर्ते पुरुष होते. त्यांचे जाण्याने त्यांची दोन्ही घरे उध्वस्त झालेली आहेत. घटनास्थळी मृतांचे च्छिन्न विछिन्न मृतदेह पाहिलेल्या ग्रामस्थांमध्ये अद्यापही दहशत असल्याचे दिसून येते. एकूण या हत्याकांडातून अतिशय क्रूरतेचे दर्शन झाल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयास पटवून दिले.
क्रूर असलेल्या सापाला झाडपाला आणि मंत्रांचे आधारे वश केल्या जाऊ शकते. परंतु क्रूर माणूस मात्र कधीच सुधारू शकत नसल्याचे सांगतांना अतिशय क्रूरतेने देवकीची सात अपत्ये ठार करणाऱ्या कंसाचा दाखला सरकारी वकिलांनी न्यायालयास दिला. क्रूरते सोबतच मारेकरी हे अतिशय बनेल आणि असभ्य असल्याचेही सरकारी वकिलांनी म्हटले. त्याकरिता त्यांनी न्यायालयातच घडलेल्या दोन प्रसंगांचे न्यायालयाला स्मरण करून दिले.
पहिला प्रसंग हा कि, मारेकर्यांनी त्यांचे सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी न्यायालयातच वादंग घातला होता. दुसरा प्रसंग मारेकऱ्यांच्या साक्ष वेळी घडला. या मारेकऱ्यातील चौथा मारेकरी हा अल्पवयीन असल्याने त्याचा खटला बाल न्यायालय अकोला येथे सुरू आहे. आकोट न्यायालयात साक्ष देताना त्याने हे चारही खून आपणच केल्याची साक्ष दिली. ह्यावर उर्वरित मारेकर्यांनीही या कथनाला दुजोरा देत आपण निर्दोष असल्याचे न्यायालयास सांगितले. त्यावरून मारेकरी हे आपल्या बचावा करिता आपल्याच परिवारातील सदस्यालाही सोडत नसल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे होते.
अशा असभ्य, क्रूर आणि बनेल मारेकऱ्यांना दया दाखविल्यास समाजास मोठी बाधा पोचणार असल्याने त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. ह्या युक्तिवादानंतर बचाव पक्षाचे वकिलास आपली बाजू मांडणे करिता पुकारण्यात आले. त्यावर न्यायालय देईल ती शिक्षा आम्हास मंजूर असल्याचे बचाव पक्षाचे वकील सत्यनारायण जोशी यांनी सांगितले. त्यानंतर मारेकऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडणे करिता बोलाविण्यात आले. त्यांनीही आपले काहीच म्हणणे नसल्याचे न्यायालयास सांगितले. त्यावर आकोट जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी ही अंतिम सुनावणी संपवली. आणि येत्या १४ मे रोजी याप्रकरणी निवाडा देणार असल्याचे सांगितले.
परंतु न्यायदाना करिता अशा पद्धतीने तब्बल ११ दिवसांचा वेळ लागणार असल्याने यासंदर्भात अनेक तर्क वितर्क लावल्या जात आहेत. त्यामध्ये सरकारी वकील जी. एल. इंगोले यांनी केलेल्या मागणीनुसार मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचा विचारही शक्य असल्याचे काहींचे म्हणणे आहे. तर असे झाल्यास आकोटचे इतिहासात फाशीच्या शिक्षेची ही प्रथमच घटना ठरणार असल्याचे काहींचे म्हणणे आहे. ह्या विविध तर्कांनी १४ मे रोजी लागणाऱ्या निवड्याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.