आकोट – संजय आठवले
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील खिरकुंड बीटमध्ये लोखंडी ट्रॅप लावून त्यात अडकलेल्या वाघाची शिकार करून व्याघ्र चर्म आणि हाडे विकणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सदस्य कुख्यात तस्कर आदीनसिंह ग्यासन बावरिया याचा जामीन अर्ज आकोट न्यायालयाने फेटाळला आहे.
वाघाची शिकार करून त्याचे व्याघ्र चर्म आणि अस्थि यांची तस्करी देशात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे व्याघ्र चर्म आणि अस्थि मिळविणेकरिता आंतरराष्ट्रीय टोळीतील सदस्यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील खिरकुंड बीटमध्ये लोखंडी ट्रॅप बसविले. त्यामध्ये अडकलेल्या वाघाचे तोंडात भाला खूपसून त्याला ठार मारले. नंतर त्याचे मांस फेकून देऊन त्याची चामडी आणि हाडे सुकविली. आणि नंतर हे अवयव रणजीत सिंग भाटिया राहणार होशियारपूर ह्या कुख्यात तस्कराला विकले.
याप्रकरणी वन अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला. त्यामुळे आदीनसिंह बावरिया हा फरार झाला होता. बराच शोध घेऊनही त्याचा पत्ता मिळत नव्हता. अशा स्थितीत पंजाब राज्यातील टायगर फोर्सने ह्या कुख्यात अपराध्यास शिताफीने कैद केले. त्याची माहिती मिळताच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे सहायक वनसंरक्षक यांनी न्यायदंडाधिकारी आकोट यांचेकडून सदर अपराध्याचा पकड वॉरंट मिळवला. आणि न्यायालयीन खटला चालविणेकरिता त्याला आकोट न्यायालयात हजर केले.
त्यावेळी आदीनसिंह याने वाघाची शिकार ते त्याचे अवयव विकण्याच्या प्रक्रिये बाबत न्यायालयात कबुली जवाब दिला. त्यावर प्रथम श्रेणी न्यायाधीश चव्हाण यांनी या अपराध्यास वन कोठडी ठोठावली. तत्पश्चात वन कोठडी भोगीत असणाऱ्या आदीनसिंह बावरिया याने आकोट जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांचे न्यायालयात जामीन मिळवणे करिता याचिका दाखल केली.
ह्या याचिकेला सरकार पक्षातर्फे कडाडून विरोध करण्यात आला. यावेळी आपल्या युक्तीवादात सरकारी वकील अजित देशमुख यांनी प्रतिपादन केले की, सदर आरोपी सराईत गुन्हेगार असुन आरोपीने तामीळनाडू, नागपुर येथील काटोल प्रकरणामध्ये वाघाची चामडी विक्रीचा व्यवहार केलेला आहे. आरोपीकडून इतर आरोपीचा शोध घेणे आवश्यक असल्याने तसेच आरोपीने वाघाची चामडी विक्री कुणाला केली त्याचा शोध घेणे आवश्यक आहे. या आरोपी विरुध्द होशीयारपुर पंजाब येथे आर.सी.नं. २१/२०२४ दि. ६.२.२०२४ रोजी दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेले आहे.
तसेच या आरोपीने कबुली जबाबमध्ये नमुद केले आहे की, गुन्हा घडल्यापासुन तो नेपाळ येथे राहत होता. त्याने तसेच वाघाचे चामडीचा अवैध विक्री व्यवहार नेपाळ, चिन इतर देशांमध्ये केलेला आहे. अशा प्रकारचे गुन्हे हा आरोपी पुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपी गुन्हा घडला तेव्हा पासुन फरार होता. या आरोपीला जामीन मिळाला तर तो पुन्हा फरार होईल. सदर आरोपी हा आंतरराष्ट्रीय तस्कर असुन तो कायमचा पसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकरणी या आधी फरार असलेले आरोपी लुझालेन धुर्वे वय वर्ष 22, रा. बिलहेरी मध्यप्रदेश, कशीश उर्फ बारसुल मडावी वय २१ वर्ष, रा. सुर्वा मध्यप्रदेश यांना जामीन मिळाला तेव्हा पासुन ते फरार होते महत्वाचे म्हणजे हे आरोपी एका ठिकाणी राहत नसुन ते आंरराष्ट्रीय व परराज्यात भ्रमंती करीत असतात. त्यांचेवर गंभीर गुन्हे असल्याने ते नेपाळ, बांगलादेश, चिन या देशांमध्ये कायमचे पसार होऊ शकतात.तसेच या प्रकरणातीलआरोपी आदिनसिंह ग्यासन बावरीया हा सराईत गुन्हागार असुन तामीळनाडू येथीलनिलगीरी वनविभाग मधील वन गुन्हा क्र. ३/२०२३ दि.११.३.२०२३ रोजी या प्रकरणामध्ये तामीळनाडू वनविभागाने या आरोपीला तेथील गुन्हयात ताब्यात घेण्यासाठी प्रोडक्शन वारंटअर्ज प्रथम श्रेणी न्यायालय आकोट येथे सादर केला आहे.
त्याची पुढील न्यायालयीनप्रक्रिया होणे बाकी आहे. तसेच प्रथम श्रेणी न्यायाधिश यांनी देखील या आरोपीचा जमानत अर्ज ना मंजुर करण्या संबंधीचा जो आदेश पारीत केला आहे तो देखील न्यायोचित आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाने वरील प्रकरणात या आरोपीने जमानत मिळण्याकरीता जो अर्ज दाखल केला आहे तो कृपया ना मंजुर करावा असा युक्तीवादसरकारी वकील अजित देशमुख यांनी वन विभाग आकोट तर्फे केला. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादा नंतर आकोट जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी या आरोपीचा जमानत अर्ज नामंजुर केला आहे. त्यामुळे तामीळनाडू वन विभाग यांचे देखील तेथील वन गुन्हयातील प्रकरणात या आरोपीला ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.