आकोट – संजय आठवले
गांजा बाळगणे व विक्री करणे प्रकरणी गत चार महिन्यांपासून अकोला मध्यवर्ती कारागृहात असलेल्या सराईत गुन्हेगाराने आकोट जिल्हा व सत्र न्यायालयात केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
या प्रकरणाची हकीगत अशी आहे की, दि. २८.०३.२०२३ रोजी हिवरखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांना गुप्त माहिती मिळाली. त्यावरुन त्यांनी राजपत्रीत अधीकारी पंच, फोटोग्राफर, वजन काटा, मोजणाऱ्यासह गोधरा फाटा येथे जावुन सापळा लावला. त्यावेळी आरोपी शत्रुघ्न भाऊलाल चव्हाण व त्याची महिला आरोपी साथीदार रेणुका शेषराव चव्हाण रा. गोरवा हे त्यांचे मोटर सायकलवर विक्री करीता गांजा हा अमली पदार्थ घेवून आले.
या आरोपींकडून गांजा विकत घेण्याकरीता आरोपी महानंद बावीसकर व सैय्यद रेहान दोन्हीही रा. हातरुन हेही तेथे आले. हिवरखेड पोलीसांनी पंचासह घेराव घालून त्यांना ताब्यात घेतले. आरोपी शत्रुघ्न भाऊलाल चव्हाण याचेकडून १५ किलो ५४० ग्राम गांजा ज्याची किंमत १ लक्ष ५३ हजार ७०० रुपये, चार मोबाईल, एक हिरो होंडा व एक होंडा शाईन मोटरसायकल तसेच १० हजार रुपये रोख असा २ लक्ष ८५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर आरोपींविरुद्ध रितसर NDPS कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल केल्यानंतर या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे गत २९.०३.२०१३ पासून हा आरोपी जिल्हा मध्यवर्ती कारागृह अकोला येथे आहे. तेथून सुटका होणेकरिता आपला जामीन मंजूर व्हावा म्हणून त्याने आकोट जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनाकरिता याचिका दाखल केली.
यावर सरकारी वकील अजीत देशमुख यांनी न्यायालयात युक्तीवाद केला की, अर्जदार आरोपी व त्याची गुन्हयातील साथीदार आरोपी रेणुका चव्हाण यांचे ताब्यात या पुर्वी फार मोठया प्रमाणात अमली पदार्थ गांजा मिळून आल्याने त्यांचे विरुध्द हिवरखेड पोलीस स्टेशनला या पुर्वी अपराध क्र.३०४१/ २०१५ कलम ८,२०,२२ NDPS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच अर्जदार आरोपी शत्रुघ्न भाऊलाल चव्हाण याचेवर पोलीस स्टेशन आकोट ग्रामीण येथेही NDPS कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
अर्जदार आरोपीस जामीन मंजुर झाल्यास बाहेर येवुन तो अशा प्रकारचे गुन्हे करण्याची दाट शक्यता आहे. आरोपी हा अंमली पदार्थ गांजा विक्री करण्याच्या सवयीचा आहे. त्याचे या कृत्यामुळे पोलीस स्टेशन हिवरखेड परिसरात मोठया प्रमाणात तरुण पिढी व्यसनाधिन झालेली असुन आरोपीचे कृत्य हे समाजास घातक आहे.
अर्जदार आरोपीची पत्नी देवकी शत्रुघ्न चव्हाण रा. बोरवा हिचे विरुध्द पोलीस स्टेशन मेडचाल हैद्राबाद राज्य तेलंगाना येथे अपराध नं.१२१६/२०२१ कलम २० (ब) NDPS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल असुन तीचे विरुद्ध आयुक्त हैद्राबाद तेलंगाना यांनी जारी केलेली निगराणी बदमाशशीट या पोलीस ठाण्यात प्राप्त आहे.
अर्जदार आरोपीचे नातेवाईक, मध्यप्रदेश, तेलंगाना येथे असुन त्यांचे विरुध्दही NDPS कायद्या प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. अर्जदार आरोपी हा सुध्दा परराज्यात येत जात असतो. या आरोपीला जामीन दिल्यास तो फरार होईल व या गुन्हयातील साक्षीदारांना धमकावून गुन्हयाच्या निष्पक्ष तपासावर दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. वरील प्रकरणात दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपीचा जमानत अर्ज फेटाळून लावला.