Sunday, November 17, 2024
Homeराज्यआकोट न्यायालयाने ठोठावला दहा वर्षांचा सश्रम कारावास…हुंडाबळी प्रकरणात नराधम सासू व पती...

आकोट न्यायालयाने ठोठावला दहा वर्षांचा सश्रम कारावास…हुंडाबळी प्रकरणात नराधम सासू व पती गजाआड…सासरा मयत झाल्याने त्याचे प्रकरण झाले बंद…

संजय आठवले

आकोट – रीतीरीवाजाने लग्न लावून घरी नांदावयास आलेल्या नवविवाहितेस सासू-सासरा व पती यांनी हूंड्याची मागणी करीत शिवीगाळ, मारहाण व अन्य प्रताडना केल्याने तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने सासू व पती यांना दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी असलेला विवाहितेचा सासरा हा न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान मयत झाल्याने त्याचे प्रकरण बंद करण्यात आले आहे.

या प्रकरणाची हकीगत अशी कि, आसरा कॉलनी आकोट येथील रहिवासी राहुल अंबादास लढके याचे लग्न दिनांक २९.०१.२०१७ रोजी धार्मिक सोपस्कार पार पाडून रितीरिवाजा नुसार झाले. भावी आयुष्याची अनेक नाजूक स्वप्ने रंगवीत नववधू सासरी नांदवयास आली. परंतु आपण सासरी नाही तर यमसदनी आल्याची त्या बिचारीला गंधवार्ताही नव्हती. आल्या आल्याच सासरच्यांनी तिला “तुझ्या बापाने लग्न चांगले केले नाही. अवाढव्य लाॅन मध्ये न करता लहानशा मंगल कार्यालयात केले. आमची योग्य बडदास्त ठेवली नाही. चांगल्या महागड्या भेटवस्तू दिल्या नाहीत. तुझ्या माहेरचे लोक अडाणी आहेत.” असे टोमणे मारून प्रताडीत करणे सुरू केले. हे करीत असतानाच तिला शिवीगाळ व मारहाणही केल्या जात होती.

अशातच पती राहुल लढके हा एका सोसायटीत कामावर लागला. त्या ठिकाणी पैसे भरण्याकरिता त्याने पत्नी स्नेहल हिला तिचे बापाकडून पाच लक्ष व अन्य गणगोताकडून दोन लक्ष रुपयांची एफ डी मागण्याचा तगादा लावला. त्यावर “आपल्या वडिलांनी आताच इतका खर्च केला. त्यांची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. त्यामुळे ते पैसे देऊ शकत नाहीत.” असे स्नेहलने उत्तर दिले. त्यामुळे संतापलेल्या लढके परिवाराने स्नेहलला क्रूरपणे शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. सोबतच घटस्फोट देण्याची धमकीही दिली.

या अमानुष त्रासाने कंटाळून अखेर स्नेहल मृत्युमुखी पडली. त्यावर स्नेहलचे वडील राम गणेशसिंह चिल्लोरकर रा. औरंगाबाद यांनी आकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की, आपली मुलगी स्नेहल हिला तिचा सासरा अंबादास लक्ष्मण लढके, सासू सरोज अंबादास लढके, व पती राहुल लढके यांनी गळा आवरून ठार केले आहे. त्यावरून आकोट पोलिसांनी भादवि कलम ३०२, ३०४ ब, ४९८ अ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. प्रकरणातील पुढील तपास सहा. पो.नि. शुभांगी दिवेकर यांनी केला.

याप्रकरणी सखोल तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ट केले गेले. त्यावर न्यायालयाने हे दोषारोप पत्र दाखल करून घेतले. त्यानंतर लढके परिवाराविरुद्ध दोषारोपण करून सदर खटला चालविला गेला. हे दोषारोप सिद्ध करणेकरिता सरकार पक्षाचे वतीने एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्ष व आरोपी पक्षाच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर आकोट जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकृष्ण चकोर यांनी या प्रकरणी निवाडा दिला.

त्यामध्ये भादवी ३०२ च्या गुन्ह्यातून आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. परंतु अन्य कलमान्वये सासू सरोज अंबादास लढके व पती राहुल अंबादास लढके, यांना भादवि कलम ३०४ ब नुसार दहा वर्षे सश्रम कारावास व 25 हजार रुपये द्रव्य दंड, हा द्रव्य दंड न भरल्यास दोन वर्षे अधिकचा कारावास तर भादवि कलम ४९८ आ अन्वये दोन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये द्रव्य दंड, हा द्रव्य दंड न भरल्यास सहा महिने अधिकचा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. आरोपींना दोन्ही शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. न्याय प्रक्रिये दरम्यान सासरा अंबादास लक्ष्मण लढके याचा मृत्यू झाल्याने त्याचे विरुद्ध प्रकरण बंद करण्यात आले.

वरील प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे जोरदार युक्तिवाद करून सहाय्यक सरकारी विधिज्ञ जी. एल. ईंगोले यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. युवा विधिज्ञ रफी काजी यांनी सरकार पक्षास सहकार्य केले तर पैरवी म्हणून पोहेकाॅं प्रकाश जोशी यांनी सहकार्य केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: