आकोट- संजय आठवले
उत्तर प्रदेशातील वाॅंटेड गँगस्टर मोहम्मद सद्दाम याने बनारस येथून आकोट मध्ये पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीशी बळजोरीने शारीरिक संबंध केल्यानंतर आकोट येथील मित्रांच्या सहकार्याने तिला वेश्याव्यवसायाकरिता विकण्याचा मनसुबा करीत असताना पलायन केलेल्या त्या मुलीने आकोट पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार आकोट न्यायालयात चाललेल्या खटल्यात आकोट न्यायालयाने त्या वाॅंटेड गँगस्टर सह आठ आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.
या संदर्भात त्या अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हकीगत अशी कि, उत्तर प्रदेशातील गॅंगस्टर मोहम्मद सद्दाम याने केलेल्या असामाजिक कारवायांमुळे उत्तर प्रदेश पोलिसांच्या यादीत त्याची वाॅंटेड म्हणून नोंद आहे. अशा स्थितीत त्याचे बनारस येथील या अल्पवयीन मुलीशी सूत जुळले. त्यानंतर त्याने तिला फुस लावून भुसावळ येथे पळवून आणले. आणि तेथून त्याने आकोट शहरातील मोमीनपुरा येथील त्याचा मित्र आझाद खान याचेशी संपर्क केला. त्या दोघांचे संगनमत झाल्यावर सद्दामने त्या मुलीला अकोला मार्गे आकोट येथे आणले. आकोट येथे आल्यावर त्या दोघांचा मित्र राजेश काळमेघ याने पुढील जबाबदारी स्वीकारली. आणि त्या मुलीला दीपा उर्फ रेश्मा खान हिचे घरी वास्तव्यास ठेवले. या वास्तव्यातच सद्दामने त्या मुलीशी दोनदा बळजोरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सोबतच तिला मारहाण व शिवीगाळही केली.
त्यानंतर आझाद खान ह्याने आपल्या ईतर मित्रांना बैठकीकरिता आमंत्रित केले. या बैठकीत त्या मुलीची वेश्या व्यवसायाकरिता विक्री करण्याचा मनसुबा करण्यात आला. हा मनसुबा त्या मुलीच्या कानावर पडला. त्यामुळे बेचैन झालेल्या त्या मुलीने या लोकांच्या तावडीतून स्वतःची सुटका करवून घेतली आणि सरळ आकोट शहर पोलीस स्टेशन गाठले. तिथे तिची आपबीती ऐकल्यावर आकोट पोलिसांनी मोहम्मद सद्दाम, आझाद खान, राजेश काळमेघ, दीपा उर्फ रेश्मा खान आणि अन्य चार जण यांचेवर भादवि कलम ३२३, ३६३, ३६६ (अ), ३७६, ३७०, ३७२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले. त्यानंतर सदर आठही जणांना अटक करून आकोट पोलिसांनी याप्रकरणी सखोल चौकशी केली आणि आकोट न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
याप्रकरणी सरकार पक्षाकडून एकूण १३ साक्षीदार तपासले गेले. परंतु या गुन्ह्यासंदर्भात सबळ पुरावा मिळू शकला नाही. त्यावर आकोट जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकृष्ण बाविस्कर यांनी या आठही आरोपींना निर्दोष ठरवून त्यांची मुक्तता केली. ह्या प्रकरणात आरोपी मोहम्मद सद्दाम व दीपा उर्फ रेश्मा खान यांची बाजू विधीज्ञ व्ही. जी. मंढरे व विधीज्ञ एस. के. सूर्यवंशी यांनी मांडली. आरोपी आझाद खान व आरोपी क्रमांक पाच यांचे तर्फे विधीज्ञ अंजुम काझी यांनी युक्तिवाद केला. तर आरोपी राजेश काळमेघ व आरोपी क्रमांक ६, ७, व ८ यांचेतर्फे विधिज्ञ बाळासाहेब टिकार यांनी कामकाज पाहिले.