Monday, December 23, 2024
Homeराज्यआकोट मतदार संघाला निधी कमी पडू देणार नाही…महसूल मंत्री विखेंची ग्वाही…अनेक योजना...

आकोट मतदार संघाला निधी कमी पडू देणार नाही…महसूल मंत्री विखेंची ग्वाही…अनेक योजना सांगितल्या…

परंतु कापूस सोयाबीनचा उल्लेखच नाही…कोनशीला व लोकार्पण सोहळा संपन्न….

आकोट – संजय आठवले

आकोट मतदार संघातील विकास कामांना लागणारा निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. उपजिल्हा रुग्णालयाची कोनशिला बसविणे तथा प्रशासकीय इमारत लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते श्रोत्यांना संबोधित करीत होते.

याप्रसंगी त्यांनी विद्यमान राज्य शासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या अनेक योजनांची माहिती दिली. मात्र सद्यस्थितीत कापूस व सोयाबीन संदर्भात आकोट मतदार संघातील शेतकरी जिकिरीला आले असतांनाही त्याबाबत मात्र ना महसूल मंत्री बोलले ना आमदार भारसाखळे बोलले. त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये नाराजी जाणवत होती.

याप्रसंगी मंचावर आमदार रणधीर सावरकर, वसंत खंडेलवाल, प्रकाश भारसाकळे, माजी आमदार संजय गावंडे, अनुप धोत्रे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल, अधीक्षक अभियंता प्रवीण सरनाईक, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार डॉक्टर विजय चव्हाण, आकोट पालिका मुख्याधिकारी डॉक्टर नरेंद्र बेंबरे, तेल्हारा तहसीलदार सोनवणे, राजेश रावणकार, गजानन उंबरकार, प्रभाकरराव मानकर, उमेश पवार,

संतोष जिंजर वाला प्रकाश गीते प्रवीण वैष्णव, हरीश टावरी यांची उपस्थिती होती. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांचेवर निशाणा साधला. वर्तमानात राज्यात होणाऱ्या घटनांचा उल्लेख करून ते म्हणाले कि, या घटनांबाबत आमचे सरकारला दोषी मानून राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात येत आहे. मात्र माजी मुख्यमंत्र्यांच्या काळातही अशा असंख्य घटना घडलेल्या आहेत. कोरोना काळातही मागील सरकारने काहीच केलेले नाही.

परंतु आता रोज नवीन जिल्ह्यात दौरे आणि सरकारवर टिकेची झोड हे एकमेव कार्य मागील मुख्यमंत्र्यांना उरले आहे. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय या प्रशासकीय इमारतीत आणावे या आमदार भारसाखळे यांचे मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले कि, भूमी अभिलेख कार्यालयात बऱ्याच नको त्या भानगडी होतात. त्यामुळे ते कार्यालय या इमारतीतच असावे. जेणेकरून त्या भानगडींना पायबंद लागेल. त्यामुळे हे कार्यालय याच इमारतीत आणले जाईल. त्यासोबतच दुय्यम निबंधक कार्यालय ही येथेच आणण्याची ग्वाही त्यांनी दिली.

शेतकऱ्यांची नापिकी झाल्यास तो उघड्यावर येऊ नये, याकरिता त्यांनी पर्यायी व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादन वाढवावे यावर त्यांनी जोर दिला. याकरिता शासन विदर्भातील प्रति शेतकऱ्याला दहा गाई देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यां वर चर्चा करण्यापेक्षा त्यांना पर्यायी व्यवसाय देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. या साऱ्या बाबी विचारात घेऊन आकोट मतदार संघाला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.

याप्रसंगी पालकमंत्र्यांचे भाषणापूर्वी उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांचे प्रास्तिकानंतर आमदार भारसाखळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतात त्यांनी प्रशासकीय इमारतीचा गत इतिहास सांगून आणखी सहा एकर जागेची मागणी केली. त्यासोबतच त्यांनी भूमी अभिलेख व दुय्यम निबंधक कार्यालय याच इमारतीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली.

आजच्या लोकार्पण सोहळ्यात कार्यकर्त्यांची मागणी असूनही आपण नरसिंग महाराज मंदिराच्या विस्तारित अर्धवट इमारतीचे लोकार्पण करण्यास नकार दिल्याचे ते म्हणाले. जिल्हा परिषदेचे १००० किलोमीटर रस्त्यांपैकी २०० किलोमीटर रस्ते आपण केल्याचेही ते बोलले. हिवरखेड नगरपंचायतीबाबत आमदार मिटकरी यांचेवर निशाणा साधित त्यांनी ते काम आपण बंद पाडून नगर परिषदेची मान्यता घेतल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसीलदार डॉक्टर विजय चव्हाण यांनी केले. तर सूत्रसंचालन जया भारती यांनी केले.

क्षणचित्रे

वेळेवर छापलेल्या या सोहळ्यांच्या निमंत्रण पत्रिकेत उल्लेख असलेल्या जि. प. अकोला अध्यक्षा, सौ. संगीता अढाऊ. आमदार अमोल मिटकरी, ॲड. किरण सरनाईक धीरज लिंगाडे, हरीश पिंपळे, नितीन देशमुख यांनी या सोहळ्याला दांडी मारल्याची उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा होती.

पालकमंत्री विखे पाटलांनी कार्यक्रमात उपअधीक्षक भूमी अभिलेख यांचे अनुपस्थिती बाबत चांगलीच नाराजी व्यक्त केली. आणि कार्यक्रमानंतर त्यांना समज देण्यास जिल्हाधिकारी यांना सांगितले.

कार्यक्रम स्थळी दोनदा पाकीटमारी झाली. त्यातील एका पाकीट माराला प्रतिभा गजानन सुरत्ने ह्या महिला पोलीस ने रंगेहात पकडले. त्याला आकोट शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. हे पाकीट रामाभाऊ गव्हाळे राहणार भांबेरी तालुका तेल्हारा यांचे होते.

संत रुपलाल महाराज यांनी आपल्याला प्रसाद म्हणून दिलेल्या आंब्याचा रस आपल्याला आतापर्यंतही पुरत असल्याचे आमदार भारसाकळे यांनी म्हटले. त्यावर तुमच्या आंब्याचा रस आमच्यापर्यंतही येऊ द्या, अशी मिश्किली पपालकमंत्री विखे पाटलांनी केली.

सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे आमदार भारसाखळे यांनी पालकमंत्री यांचे समोर मागण्यांचा पाढा वाचला. परंतु मतदारसंघातील त्रस्त शेतकऱ्यांच्या घरात पडून असलेल्या सोयाबीन व कापूस या बाबत कोणताही उल्लेख केला नाही. पालकमंत्र्यांनीही त्यावर बोलणे टाळले

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: