Sunday, December 22, 2024
Homeराज्यआकोट सोडले वाऱ्यावर...मुख्याधिकारी गेल्यात रजेवर...परस्पर बदली करून घेण्याची शक्यता...तेल्हारा पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे प्रभार...

आकोट सोडले वाऱ्यावर…मुख्याधिकारी गेल्यात रजेवर…परस्पर बदली करून घेण्याची शक्यता…तेल्हारा पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे प्रभार सोपविला…

आकोट- संजय आठवले

आकोट नगर परिषदेचा कारभार पराकोटीचा ढेपाळला असून त्याद्वारे आम नागरिक व कंत्राटदार अगदी मेटाकुटीला आलेले असताना आकोट पालिका मुख्याधिकारी डॉक्टर मेघना वासनकर या दिनांक १७ ऑक्टोबर पर्यंत रजेवर गेल्या आहेत. आकोट पालिकेत आल्यापासूनच बदलीकरिता धडपडणाऱ्या ह्या मुख्याधिकारी रजा काळातच परस्पर बदलीवर जाण्याची तजवीज करणार असल्याचेही वृत्त आहे. त्यांच्या अनुपस्थितीत तेल्हारा पालिका मुख्याधिकारी सतीश गावंडे यांच्याकडे आकोट पालिकेचा प्रभार देण्यात आला आहे.

आकोट पालिका मुख्याधिकारी डॉक्टर मेघना वासनकर ह्या मुळात आकोट येथे येण्यासच नाखुश होत्या. परंतु शासनाने तंबी दिल्याने त्या पाच महिन्यांपूर्वी आकोट पालिकेत रुजू झाल्या. याच दरम्यान पालिका कार्यकारणी बरखास्त झाल्याने उपविभागीय अधिकारी प्रशासक पदी आले. त्याने ही नव्या दमाची जोडगोळी शहराकरिता काहीतरी भरीव करणार अशा आशा पल्लवीत झाल्या. परंतु आकोटात येताना मेघनाताई बदलीचे स्वप्न सोबत घेऊनच आल्या होत्या. त्यामुळे आल्याआल्याच त्यांनी अजब कारभार सुरू केला.

वास्तविक मुख्याधिकारी हे अतिशय लोकाभिमुख पद आहे. नागरिकांचे देवघर, किचन, बाथरूम, बेडरूम, टॉयलेट, त्यातील सांडपाणी, कचरा यांची विल्हेवाट याबाबतीत निर्णय घेणारे हे पद आहे. नागरिकांच्या जन्म मृत्यूची नोंद ठेवणे, त्यांच्या आरोग्याची निगा राखणे, शहरात योग्य त्या सुविधा निर्माण करणे हीच जबाबदारीही मुख्याधिकाऱ्यांचीच आहे. शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे यावर वचक ठेवण्याचा जिम्माही मुख्याधिकाऱ्यांचाच आहे. परंतु याची जाणीव विद्यमान मुख्याधिकारी यांना आहे असे कधी दिसलेच नाही. बदलीवर जायचे म्हणून “नागरिकांना अतोनात त्रास द्या” असा कानमंत्र त्यांना कुणीतरी दिला की काय? असे वाटण्याजोगी परिस्थिती विद्यमान मुख्याधिकाऱ्यांनी करून ठेवली आहे. आपली गाऱ्हाणी घेऊन कुणी आपल्यासमोर येता कामा नये असा फतवाच त्यांनी काढलेला आहे. त्यामुळे घरकुल, गुंठेवारीचे लाभार्थी, अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांनी बाधित लोक पालिकेच्या वाऱ्या करून अगदी घायकुतीला आले आहेत.

वास्तविक कागदपत्रांची छानणी व पूर्तता करूनच घरकुलाचा प्रथम टप्पा दिला गेला. परंतु दुसरा टप्पा अदा करण्याकरिता मेघनाताईंनी स्वतःचे नियम काढले. लाभार्थ्यांना नवीन दस्तावेज मागितले. त्यासाठी नागरिकांना पाचशे ते हजार रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागत आहे. हे दस्तावेज तयार करताना दोन ते तीन महिने कालावधीही लागत आहे. ती शिक्षा वेगळीच. काहींनी ही पूर्तता केली तर त्यावर “अभ्यास करते” असे म्हणून ती फाईल बाईंनी स्वतःकडेच ठेवून घेतली. त्यावर केवळ एक स्वाक्षरी हवी आहे. परंतु अद्यापही ती झालीच नाही. असे लाभार्थी रोज येतात. परंतु त्यांना बाईंना भेटण्याची मुभा नाही. बिचारे पाच वाजेपर्यंत बसतात. नंतर हिरमुसले होऊन परत जातात. अनेक महिला डोळे पुसत निघून जातात. पण बाईंना पाझर फुटत नाही. गुंठेवारीचेही तसेच. अभ्यासाकरिता ठेवलेल्या असंख्य फायलींवर बाईंची केवळ एक स्वाक्षरी हवी आहे. पण तिचा मुहूर्त अद्यापही निघालेला नाही. अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांच्या शेकडो तक्रारी पालिकेत पडून आहेत. त्यांची काहीच सुनवाई नाही. या उदासीनतेने नागरिकांची भांडणं पोलिसात न्यायालयात जात आहेत. या त्रासांनी बाधित एखादा चपराशा सोबत हूज्जत घालून मुख्याधिकाऱ्यांना भेटतो. पण त्याचे गाऱ्हाणे ढिम्मपणे ऐकून घेण्याखेरीज अन्य कोणतीच कार्यवाही होत नाही. अशा लोकांचा त्रास होऊ नये याकरता बाईंनी एक तोडगा काढला आहे. त्या पालिकेतील मुख्याधिकारी कक्षात न बसता न पालिका वाचनालयात आपला ठिय्या मांडतात. तिथे मग त्यांच्या मर्जीतील कामांचा विचार केला जातो.

बाईंनी जारी केलेल्या नवीन नियमांनी कंत्राटदारही रडकुंडीस आलेले आहेत. बाईंच्या येण्यापूर्वीच झालेल्या कामांची देयके अडवून ठेवलेली आहेत. सुरू असलेल्या कामांबाबत नवीनच नियम लागू केले गेले आहेत. त्यामुळे अनेक कामे चक्क बंद पडलेली आहेत. त्या अर्धवट कामांनी नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी नागरिक व कंत्राटदारांमध्ये खडाजंगीही झाली आहे. पण मुख्याधिकाऱ्यांवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. अशा स्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मार्गदर्शन मागविण्याची विनंती केली जाते. त्यालाही कवडीची किंमत दिली जात नाही. त्रस्त घटक मग पालिका प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे कडे जातात. ते पीडितांचे म्हणणे ऐकून मुख्याधिकाऱ्यांना सूचना करतात, लिखित पत्रही देतात. पण त्यावरही कोणताच इलाज केला जात नाही. मुख्याधिकाऱ्यांच्या ह्या बेछूट वर्तनाने उपविभागीय अधिकारीही हैराण झालेले आहेत.

अशा स्थितीत मुख्याधिकारी मॅडम रजेवर गेल्या आहेत. रजा काळातच त्या परस्पर बदलीवर जाणार असल्याची बोलवा आहे. असे झाले तर आकोटकर मोठे हर्षित होतील. ह्यात जराही शंका नाही. परंतु वासनकर बाई अशा का वागल्या? हा प्रश्न मात्र त्यांना सततावीतच राहणार आहे. असे प्रश्न मागील अनेक मुख्याधिकाऱ्यांनीही निर्माण करून ठेवलेले आहेत. तेही आकोटात येण्यास नाखूशच होते. वास्तविक ही नोकरी स्वीकारते समयीच कुठेही बदलीवर जाण्याची अट ह्या लोकांनी मान्य केलेली असते. त्यामुळे दिल्या ठिकाणी चोख काम त्यांच्याकडून अपेक्षित आहे. परंतु गत इतिहास पाहू जाता नवीन आलेल्या पेक्षा जुनाच बरा होता असे वाटण्याजोगे काम प्रत्येक जणच करीत आलेला आहे. मात्र विद्यमान मुख्याधिकारी बदलीवर गेल्यानंतर येणारा कसाही असला तरी तो यांच्यापेक्षा चांगलाच ठरेल अशी कामगिरी वासनकर बाईंनी करून ठेवलेली आहे. आता त्या रजेवर गेल्या आहेत. बदलीसाठीही त्या इच्छुक आहेत. अशातच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी खुद्द उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी बदलीकरिता बाईंना मदत करून त्यांचे जागी दुसरा मुख्याधिकारी आणावा, अशी जनतेत मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: