आकोट – संजय आठवले
आकोट मतदार संघातील भाजप नेते व कार्यकर्ते यांनी प्रचंड विरोध केल्यानंतरही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश भारसाखळे यांना आकोट मतदार संघाची उमेदवारी दिली. त्याचा निषेध म्हणून भाजप नेते डॉक्टर गजानन महल्ले यांनी आपली अपक्ष उमेदवारी घोषित केली.
त्यावेळी त्यांचे वर बंडखोरी केल्याचा ठपका ठेवून त्यांना पक्षातून निलंबित केले गेले. परंतु त्याचवेळी दर्यापूर मतदार संघात भारसाखळे यांनी पक्षविरोधी कारवाया करून रमेश बुंदिले यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले. त्यामुळे प्रकाश भारसाखळे यांचेवर डॉक्टर गजानन महल्ले यांचे प्रमाणेच निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
परंतु भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ती मागणी धुडकावून लावली. पण आता आकोटचे भाजपा उमेदवार प्रकाश भारसाखळे यांनी चक्क दर्यापूरचे अपक्ष उमेदवार रमेश बुंदिले यांचे करिता मतदान करण्याची विनंती करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकला आहे.
या व्हिडिओमुळे आकोट तेल्हारा भाजप परिवारात आणि मतदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यामुळे ऐन मतदानापूर्वी हा प्रकार घडल्याने देवेंद्र फडणवीस यावर काय ॲक्शन घेतात याकडे लक्ष लागले आहे.