महानगरात राज्यस्तरीय कुस्तीगीर पंच शिबिर संपन्न
संतोषकुमार गवई,अकोला
अकोला- राज्याला कुस्तीची मोठे परंपरा लाभली असून त्याला पूर्वी राजाश्रय मिळत होता. मात्र या काळात हा राजाश्रय लुप्त होऊन कुस्ती क्षेत्राची थोडीफार पीछेहाट होत आहे.म्हणून चांगले पैलवान राज्यात निर्माण व्हावे यासाठी कुस्तीगरांना ऑलिंपिकच्या धर्तीवर प्रशिक्षणाची खरी गरज असून या दृष्टीने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन म.रा. कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष,माजी खा. रामदास तडस यांनी केले. मुर्तीजापुर रस्त्यावरील आरजी सभागृहात म. रा. कुस्तीगीर संघ तथा अकोला शहर व जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कुस्तीगीर पंच शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या पंच शिबिरात विदर्भासहित धुळे जिल्ह्यातील तब्बल साठ पंच व कुस्तीगीर संघाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.यात अध्यक्ष म्हणून तडस मार्गदर्शन करीत होते.शिबिराचे उद्घाटक म्हणून राज्याचे माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे होते.यावेळी विदर्भ कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संजय तिरथकर, विदर्भ कुस्तीगीर संघाचे सचिव रणवीरसिंग राहाल ,आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच व प्रशिक्षक प्रा. दिनेश गुंड, विदर्भ कुस्तीगीर संघाचे कोषाध्यक्ष अविनाश लोखंडे, धुळे जिल्ह्याचे सचिव सुनील चौधरी, विदर्भ केसरी विजय बुज,आयोजक विदर्भ केसरी युवराज गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे पदाधिकारी, विदर्भ केसरी युवराज गावंडे यांनी साकार केलेल्या या पंच शिबिराचा प्रारंभ शक्ती व भक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हनुमंताच्या पूजनाने व मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष, माजी खा. रामदास तडस यांनी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी केलेल्या क्रीडा विकासाचा आलेख सादर केला. कुस्तीला राजाश्रय मिळावा यासाठी गावंडे यांनी पाठपुरावा केला होता. महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी अथवा प्रदेश स्तरीय केसरींना शासकीय नोकऱ्यात सहभाग वाढवता यावा यासाठीही कुस्तीगीर संघाने पाठपुरावा केला आहे. अशा या कुस्तीगीरांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या म. रा कुस्तीगीर संघाला राष्ट्रीय कुस्तीगीर महासंघाची मान्यता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी आपले विचार व्यक्त करीत विदर्भ ही कुस्तीगृहांची भूमी असून या भूमीत कसदार व निकोप पैलवान उदयास आले पाहिजेत यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले,. कार्यक्रमात दिनेश गुंड यांनीही मार्गदर्शनपर भाषण करीत कुस्तीतल्या पंचांची भूमिका व कर्तव्य याची बाजू मांडली.यावेळी उपस्थित सर्व पंचाचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात संपन्न झालेल्या कार्यक्रमात विदर्भातील सर्व जिल्ह्यातून महिला, पुरुष कुस्ती पंच मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्यांचा शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक व संचालन संजय तीरथकर यांनी करून या उपक्रमाची माहिती सादर केली. आभार रणवीरसिंग रहाल यांनी मानलेत. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच सोनू काबुलिये, गजानन कुलकर्णी समवेत विदर्भातील बहुसंख्य जिल्ह्यातील पंच व कुस्तीगीर उपस्थित होते.