Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीअकोला | त्या फरार झालेल्या १३ आरोपींचा शोध सुरू...फरारींमध्ये प्रकल्पाच्या दोन व्यवस्थापकांचा...

अकोला | त्या फरार झालेल्या १३ आरोपींचा शोध सुरू…फरारींमध्ये प्रकल्पाच्या दोन व्यवस्थापकांचा समावेश…काय प्रकरण आहे?…वाचा

आकोट- संजय आठवले

तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बुद्रुक येथील सौर ऊर्जा प्रकल्पात वन्य पशूंची शिकार करण्यासंदर्भात दाखल वन गुन्ह्यातील या प्रकल्पाच्या दोन व्यवस्थापकांसह १३ आरोपींचा शोध अकोला वनविभागाने युद्धस्तरावर घेणे सुरू केले असून या आरोपींनी एका आठवड्याचे आत वनविभागाकडे शरणागती न पत्करल्यास त्यांचे शोधार्थ पोलीस विभागाची मदत घेतली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या प्रकल्पांतर्गत बऱ्याच गुढ हालचाली सुरू असून या आरोपींच्या अटकेनंतर यातील अनेक रहस्य उघडकीस येणार असल्याने यासंदर्भात अकोला वनविभाग ॲक्शन मोडवर आला आहे.

सौर ऊर्जा प्रकल्प तळेगाव बुद्रुक ता. तेल्हारा येथे वन्यपशूंची मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्याची तक्रार अकोला वनविभागाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने आकोट वनपाल आर. टी. जगताप, वनरक्षक सी. एम. तायडे, ए. पी. श्रीनाथ, वनकर्मचारी सोपान रेळे, विकास मोरे, दीपक मेसरे व सुमंत रजाने या पथकाने दिनांक ११ व १३ नोव्हें. रोजी या प्रकल्पाची तपासणी केली. त्यावेळी या ठिकाणी काळवीट, हरिण, मोर व अन्य पक्षी यांची हाडे, कवट्या व पिसे आदी अवशेष मोठ्या प्रमाणावर आढळून आले. त्याचा रीतसर पंचनामा करण्यात आला. त्यावर स्वाक्षरी करण्यास सुरक्षारक्षकांनी नकार दिला. यासंदर्भातील प्रश्नांवरही त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. उलट चौकशी पथकाचे कामात विघ्न आणण्याचा प्रयास केला. त्यामुळे हे पथक तिथून परत आले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. ओवे यांनी घटनास्थळी भेट दिली. तेथिल वस्तुस्थिती जाणून घेतली असता त्या ठिकाणी केवळ प्रकल्प व्यवस्थापक सौरभ भाऊसाहेब नलावडे व कनिष्ठ अभियंता प्रभात सिंग श्रीगोविंद सिंग ठाकूर हे दोघेच हजर असल्याचे आढळले.

अन्य सारे सुरक्षारक्षक तेथून फरार झाले होते. तेथील सत्यता पडताळून या साऱ्यांवर वन्य पशु संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर फरार आरोपींचा शोध घेतला असता, दीपक विलास खारोडे, सागर अशोक मानखैर व वैभव प्रतिक बंड या तिघांना अकोला येथून अटक करण्यात आली. या तिघांना तेल्हारा न्यायालयाने आधी वनकोठडी दिली. व त्यानंतर जामीनावर सोडले.

परंतु ह्या प्रकरणातील फरार झालेले १३ आरोपी अद्यापही बेपत्ता असून वन विभागाद्वारे त्यांचा शोध घेतल्या जात आहे. त्या फरार आरोपींची नावे येणेप्रमाणे – १) अंकुर इंद्रकुमार जैन रा. आकोट, २) चिराग वगरिया (मॅनेजर डाऊनींग ग्रीड को. मुंबई), ३) पवन रणपिसे (मॅनेजर सोलर इरा कंपनी पुणे), ४) सौरभ भाऊसाहेब नलावडे (अभियंता) रा. कवलापूर ता. मिरज जि. सांगली, ५) अमोल महादेव काळे रा. हिंगणी बु. ता. तेल्हारा, ६) योगेश गजानन धामोडे रा. मालठाणा ता. तेल्हारा, ७) भूषण प्रमोद खारोडे रा. तळेगांव बु. ता. तेल्हारा, ८) सचिन अरुण खारोडे रा. तळेगांव बु. ता. तेल्हारा, ९) आकाश अरुण खारोडे रा. तळेगांव बु. ता. तेल्हारा, १०) नितीन भुजंगराव चोपडे रा. तळेगांव बु. ता. तेल्हारा, ११) सुनील दिनकर खुमकर रा. अकोली रुपराव ता. तेल्हारा, १२) मयूर सुरेश खारोडे रा. तळेगांव बु. ता. तेल्हारा, १३) प्रभातसिंग श्रीगोविंदसिंग ठाकूर (कनिष्ठ अभियंता) रा. सांगुणी ता. रामपूर जि. सतना,(मध्यप्रदेश)

या सर्व आरोपींना येत्या एक आठवड्याचे आत वनविभाग अकोला यांच्याकडे शरण येण्याचा अल्टिमेटम देण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसे न झाल्यास ह्या आरोपींचे शोधार्थ पोलिसांकडून मदत घेतली जाणार असल्याचे खात्रीलायक कळते. ह्या सुरक्षारक्षकांखेरिज या ऊर्जा प्रकल्पाशी अन्य काही लोकही संबंध ठेवून आहेत. यासोबतच या प्रकल्पातील साहित्य राजस्थान येथील एका कंपनीला विकल्याची ही माहिती आहे. ह्या खरेदीदार कंपनीने हे सारे साहित्य नेण्याकरिता मोठमोठे कंटेनर्सही पाठवले आहेत. परंतु वनविभागाने कार्यवाहीचा बडगा उगारल्याने हे सारे कंटेनर्स दम चोरून सुरक्षित जागी उभे आहेत.

एकीकडे असे सुरू असताना दुसरीकडे ह्याच साहित्याचा हैदराबाद येथील दुसऱ्या कंपनीशीही सौदा झाल्याचे समजते. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे आणि रहस्यमय बनले आहे. त्यात वन विभागाची एन्ट्री झाल्याने वनविभागाच्या कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्याखेरीज हे साहित्य नेमके कोणती कंपनी नेते यावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. एकाच बाबतीत दोन राज्यातील दोन कंपन्याशी व्यवहार होत असल्याने या ठिकाणी ठकबाजीही होण्याची शक्यता बळावली आहे. वनविभागाचे गुन्हे दाखल होऊन फरार झालेल्या १३ आरोपींमध्ये हा प्रकल्प उभारणाऱ्या डाऊनिंग ग्रीड को. मुंबई व सोलर इरा कंपनी पुणे या दोन कंपन्यांचे मॅनेजर अनुक्रमे चिराग वगरिया आणि पवन रणपिसे यांचाही समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणाला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांना अटक झाल्यावर आणि त्यांनी माहिती दिल्यावरच या साऱ्या रहस्यावरील पडदा उठल्या जाऊ शकतो. त्यामुळे फरार आरोपींच्या शोधार्थ ॲक्शन मोडवर आलेल्या वनविभागाच्या कार्यवाहीकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: