अकोला – महाराष्ट्राचे दैवत असलेल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण-मध्य रेल्वेने नांदेड विभागातून तीन विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अकोला येथून मंगळवारी विशेष एक्स्प्रेस पंढरपूरसाठी निघणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांना पंढरपूर गाठणे सोयीचे व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अकोला ते पंढरपूर दरम्यान एकदिवसीय विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार असून, 16 जुलैला दुपारी सव्वाबारा वाजता रेल्वे हिंगोली स्थानकावर पोहोचणार आहे. त्यानंतर वसमत, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर, बिदर, विकाराबाद, कलबुर्गी, सोलापूर, कुडूवाडीमार्गे पंढरपुरात 17 जुलै रोजी सकाळी 10:50 वाजता पोहोचणार आहे. ही रेल्वे परतीच्या प्रवासाला पंढरपूर येथून 17 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता निघणार असून, हिंगोली रेल्वेस्थानकावर सायंकाळी पाच वाजता तर अकोला येथे रात्री आठ वाजता पोहोचणार आहे.
दरम्यान, या विशेष रेल्वे गाड्यांमध्ये 1 वातानुकूलित, 4 स्लीपर क्लास आणि 17 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत. या विशेष गाडीला दोन्ही दिशेला वाशीम, हिंगोली, बसमत, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगाव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जाहिराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चित्तपूर, वाडी, कलबुरगी, सोलापूर, कुईवाडी रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
रेल्वेगाडीला राहणार 22 बोगी
आषाढी एकादशीनिमित्त धावणाऱ्या विशेष रेल्वेगाडीला 22 बोगी राहणार आहेत. यात एक वातानुकूलित, चार स्लीपर तर 17 बोगी जनरल जोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा फायदा हजारो प्रवाशांना होणार आहे.