Akola Loksabha: अकोला लोकसभेच्या निवडणूक प्रचाराआधीच मतदार संघात भेटीगाठीचे सत्र सुरू आहे. तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील आणि भाजपचे बंडखोर उमेदवार व कुणबी समाजाचा मोठा चेहरा बाळापूरचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांची गळाभेट झालीय…या गळभेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले असून अकोला मतदार संघातील कुणबी मतदार कुणाच्या बाजूने जाणार असे राजकीय तज्ञ तर्क वितर्क लावत आहे.
अकोला मतदार संघ जातीपातीच्या राजकारणासाठी अवघ्या विदर्भात प्रसिध्द आहे. या जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक जातीच्या आधारावर लढविली जाते. या मतदार संघात मराठा पाटील आणि बौद्ध समाजाचे वर्चस्व असून दोन्ही जातीचे राजकारण या जिल्ह्यात पाहायला मिळते. सोबतच या मतदारसंघात कुणबी मतदारांची संख्या जवळपास ३ लाखांच्या आसपास आहे. आतापर्यंत कुणबी मतदार हा खासदार संजय धोत्रे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. मात्र, आता कुणबी समाजातील मोठा नेताच उमेदवार असल्याने कुणबी समाजाची मते विभागली जाणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
भाजपसाठी जीवाचे रान करणारे राजकारणात आधीपासून सक्रिय असलेले बाळापूरचे माजी आमदार व कुणबी समाजाचे मोठे नेते नारायणराव गव्हाणकर यांच्या मागे मोठा जनाधार आहे. त्यामुळेच खासदार संजय धोत्रे अडीच लाखांपेक्षा मतांनी विजय मिळवला होता. गव्हाणकर यांनी भाजप सोबत बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपच्या काही मोठ्या नेत्यांनी गव्हाणकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अपयशी ठरला आहे. तर येणाऱ्या 8 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून गव्हाणकर आपला अर्ज मागे घेतील किंवा कोणत्या दुसर्या उमेदवाराल पाठींबा देतील? किंवा अपक्ष निवडणूक लढतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.