Akola Loksabha – अकोला लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत अकोला मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत 52.69 टक्के मतदान झाले. अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होते. अंतरिम आकडेवारीनुसार मतदानाचे प्रमाण 60 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याने पोलिंग पार्ट्यांकडून निवडणूकविषयक दस्तऐवज दाखल करून घेणे, आवश्यक तपासण्या आदी कार्यवाही नियोजनभवनात स्थापित नियंत्रण कक्षाद्वारे रात्री उशिरापर्यंत सुरू आहे. मतदानाचे प्रमाण 60 टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.
शहरात व ग्रामीण भागात सकाळी 7 पुर्वीच मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावण्यात सुरूवात केली. वृध्द, ज्येष्ठ, महिला, विविध क्षेत्रातील नागरिक, तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार यांच्याबरोबरच मतदान प्रक्रियेत नवमतदारांचाही उत्साह दिसून आला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह डॉ. जुईली अजित कुंभार यांनी सीताबाई कला महाविद्यालयातील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
आज शुभ मुहुर्त असल्याने जिल्ह्यात अनेक विवाह सोहळे साजरे झाले. यावेळी वधु – वरांनी विवाह सोहळ्यादरम्यान मतदान केंद्रावर पोहोचून आपले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केले. तेल्हारा येथील भावजी रावजी पोहरकर वय 102 वर्ष यानी तेल्हारा बूथ न प शाळा क्र २ येथे मतदानाचे कर्तव्य पार पाडले.
जिल्हा प्रशासनाकडून वन्यजीवसमृध्द जंगल, कृषी संस्कृती अशा विविध थीम घेऊन आदर्श मतदान केंद्रे साकारण्यात आली. प्रत्येक केंद्रावर उन्हापासून बचावासाठी मंडप, सावलीची सोय, पेयजल, मेडीकल कीट, दिव्यांगासाठी व्हील चेअर आदी विविध सुविधा उपलब्ध होत्या.
मतदारसंघातील 50 टक्के केंद्रांवर वेब कास्टिंगद्वारे देखरेख ठेवण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार हे स्वत: पूर्णवेळ कक्षात राहून प्रत्येक केंद्राची माहिती व अडीअडचणींचा वेळीच निपटारा करत होते.
उप जिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, सहाय्यक माहिती विज्ञान अधिकारी श्रीनिधी वाजपेयी आदी कक्षात पूर्णवेळ उपस्थित होते.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव, अकोला पूर्व मतदारसंघात डॉ. शरद जावळे, अकोट मतदारसंघात मनोज लोणारकर, बाळापूर मतदारसंघात अनिरूध्द बक्षी, रिसोड मतदारसंघात वैशाली गावंडे देवकर, मुर्तिजापूर मतदारसंघात संदीपकुमार अपार यांनी आपापल्या मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व केंद्राशी संपूर्णवेळ समन्वय व संनियंत्रण ठेवले.