Akola Loksabha : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघासाठी दाखल 17 अर्जांपैकी दोन व्यक्तींनी आपले अर्ज मागे घेतले. त्यानुसार निवडणुकीसाठी 15 उमेदवार रिंगणात आहेत.
निवडणूकीसाठी दाखल 17 अर्जांपैकी नारायण हरिभाऊ गव्हाणकर (अपक्ष) व गजानन साहेबराव दोड (अपक्ष) असे दोन अर्ज आज मागे घेण्यात आले. त्यानुसार उर्वरित 15 उमेदवारांना चिन्हवाटपासाठी बैठक निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्या दालनात झाली. बैठकीला उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक सामान्य निरीक्षक रामप्रतापसिंग जाडोन, स्पेसिफाईड सहायक निवडणूक अधिकारी डॉ. शरद जावळे आदी उपस्थित होते.
बैठकीत सिलेंडर या चिन्हाची मागणी प्रकाश यशवंत आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी), व शेख नजीब शेख हबीब (इंडियन नॅशनल लिग) या दोन्ही उमेदवारांकडून करण्यात आल्याने ‘ड्रॉ’ काढण्यात आला. त्यात हे चिन्ह शेख नजीब शेख हबीब यांना मिळाले. प्रकाश यशवंत आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाले.
उर्वरित उमेदवारांचे पक्ष व चिन्हे पुढीलप्रमाणे : अनुप संजय धोत्रे (भारतीय जनता पार्टी, कमळ), अभय काशिनाथ पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, पंजा), काशिनाथ विश्वनाथ धामोडे (बहुजन समाज पार्टी, हत्ती), बबन महादेव सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी, टीव्ही),
मुरलीधर पवार (अपक्ष, फलंदाज), मो. एजाज मो. ताहेर (अपक्ष, जहाज), धर्मेंद्र चंद्रप्रकाश कोठारी (अपक्ष, एअर कंडिशनर), अशोक किसन थोरात (अपक्ष, रोडरोलर), रत्नदीप सुभाषचंद्र गणोजे (अपक्ष, हिरा), ॲड. उज्ज्वला विनायक राऊत (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, ऊस घेतलेला शेतकरी). प्रीती प्रमोद सदांशिव (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सोशल, चिन्ह- गॅस शेग़डी),
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक आयोगाकडून चिन्हाचं वाटप करण्यात आलं आहे. प्रकाश आंबेडकर यांना ‘प्रेशर कुकर’ हे चिन्हं देण्यात आलं आहे. प्रकाश आंबेडकर हे स्वत: अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत. ते वंचितचे उमेदवार आहेत. त्यांना निवडणूक आयोगाकडून ‘प्रेशर कुकर’ चिन्हं देण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना प्रेशर कुकर या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. प्रकाश आंबेडकर यांचा अकोल्यात भाजपच्या अनुप धोत्रे यांच्याविरोधात सामना होणार आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांना शिट्टी चिन्हं
प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांना शिट्टी चिन्हं मिळालं आहे. दिनेश बूब हे अमरावतीचे प्रहारचे उमेदवार आहेत. अमरावतीत महायुतीकडून सध्याच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवनीत राणा या कमळच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे यांचा उमेदवारी देण्यात आली आहे. ते काँग्रेसच्या पंजाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातही तिरंगी लढत बघायला मिळणार आहे.