Monday, December 23, 2024
Homeराज्यअकोला | फडणवीसांच्या पाल्य जिल्ह्यात भाजप जिल्हा व महानगर अध्यक्ष पदावरून असंतोष...

अकोला | फडणवीसांच्या पाल्य जिल्ह्यात भाजप जिल्हा व महानगर अध्यक्ष पदावरून असंतोष वाढला…पक्षात एककल्लीपणाचा आरोप…राज्य सांभाळणारे फडणवीस पाल्य जिल्ह्यातच नापास…

आकोट- संजय आठवले

अकोला : भाजपने राज्य पातळीवरील कार्यकारणीत मोठे फेरबदल केल्याने अकोला जिल्हाध्यक्ष आणि महानगर अध्यक्ष पदांच्या नेमणुका करणेकरिता पक्षाकडून संभावित नावांची नूकतीच चाचपणी करण्यात आली असून या चाचपणीत जिल्हाध्यक्ष व महानगर अध्यक्ष पदांकरिता दोन नावे नक्की केल्याची चर्चा आहे. परंतु करड्या शिस्तीचा आव आणणाऱ्या भाजपमध्ये या दोन नावांवरून प्रचंड घमासान सुरू झाले असून ह्या निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे करण्यात येत आहे. राज्याचे गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या शिस्तप्रिय फडणवीस यांच्या पाल्य जिल्ह्यात त्यांच्याच पक्षांतर्गत हुकुमशाही पद्धतीने पद नियुक्ती होत असल्याने या ठिकाणी फडणवीस चक्क नापास झाल्याचे चित्र आहे.

भारतीय जनता पार्टीची जम्बो प्रदेश कार्यकारणी नुकतीच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठ्या गाजावाजात जाहीर केली. ६ सरचिटणीस,१३ उपाध्यक्ष, सचिव,कार्यकारणी सदस्य असा भल्या मोठ्या कार्यकारणीत तब्बल बाराशे लोकांचा समावेश आहे. या कार्यकारणीत अकोला जिल्ह्यालाही प्रतिनिधित्व देण्यात आले असून आमदार रणधीर सावरकर यांची प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. त्यांचेकडेच अकोला जिल्ह्याचे अध्यक्षपदही असल्यामुळे आणि त्यांची नियुक्ती प्रदेश सरचिटणीस पदी झाल्यामुळे सहाजिकच त्यांना जिल्हाध्यक्ष पद सोडावे लागणार आहे. त्याकरिता काही नावांची चाचपणी करणेकरिता भारतीय जनता पक्षाचे विभाग संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर हे काल-परवा अकोला येथे येऊन गेले.

भारतीय जनता पक्षाच्या अकोला जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदासाठी बरीच नावे चर्चेत होती त्यामध्ये नारायणराव गव्हाणकर, मनोहरराव रहाणे, अंबादास उमाळे, डॉ. अमित कावरे, गजानन उंबरकर, गणेश अंधारे ,राजू नागमते, डॉ. अशोक ओळंबे तसेच महानगर अध्यक्षपदासाठी विजय अग्रवाल, मोतीसिंग मोहता, सिद्धार्थ शर्मा, डॉ. विनोद बोर्डे, हरीश अलिमचंदाणी, डॉ. अशोक ओळंबे,व इतर नावे चर्चेत होती.

विभाग संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांनी यासंदर्भात लोकशाही प्रक्रिया राबविण्याचा बहाणा केला. त्याकरिता कार्यकर्त्यांची एक बैठक बोलाविण्यात आली. या बैठकित प्रत्येकाकडून अध्यक्ष निवडी संदर्भात त्यांची वैयक्तिक मते जाणून घेतली. त्यानंतर एकमताने अकोला जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी गणेश अंधारे तसेच महानगर अध्यक्षपदी विजय अग्रवाल यांच्या नावांना अधिक पसंती असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

परंतु त्यानंतर आता पक्षांतर्गतच काही लोकांनी ही निवड चुकीच्या पद्धतीने झाली असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू केली आहे. त्यांचे मते संघटन मंत्र्यांनी एकेकाला त्याचे वैयक्तिक मत एकांतात विचारायला हवे होते. परंतु तसे न होता सामूहिकरीत्या १०-२० लोकांना एकत्रित बोलावून त्यांना त्यांची मते विचारण्यात आलीत. असे करण्यामागे एक करेक्ट प्लॅनिंग होते. यातील काही पढविलेले पोपट होते. त्यानी आपल्याला पढविलेले बोलून दाखविले. त्याला इतरांनी माना डोलावून संमती दिली. अशाप्रकारे १ तासात तब्बल १५० च्या वर कार्यकर्त्यांची वैयक्तिक मते जाणून घेण्यात आलीत. चर्चा अशी ही आहे कि, यातील अनेक कार्यकर्त्यांना जे महानगरपालिका निवडणुकीकरिता बाशिंग बांधून तयार आहेत, त्यांना आधीच महानगरपालिका निवडणुकीचा धाक दाखवून ही नावे त्यांच्या तोंडी वदवून ठेवण्यात आली होती. त्यानुसार महानगर अध्यक्ष पदाकरिता विजय अग्रवाल यांचे नाव पक्के करण्यात आले.

गणेश अंधारे यांचा नावाचा विचार करता हे गृहस्थ चार-पाच वर्षांपूर्वीच काँग्रेस मधून भाजपवासी झालेले आहेत. सद्यस्थितीत त्यांचे वर अकोला दक्षिण मंडळ अध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे. परंतु एवढ्या कमी कालावधीत भाजपमध्ये येऊन अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात कशी पडली?
अध्यक्षपदाच्या शर्यतीत एवढे जुने जाणते कार्यकर्ते, पदाधिकारी असताना, एखाद्या नवख्या व नुकताच पक्षात आलेल्या व्यक्तीने आपल्या अशा कोणत्या कामगिरीचा प्रभाव पक्षश्रेष्ठींवर पाडला? असे प्रश्न आता वर्षानुवर्षे काम करणाऱ्या भाजपामधील सामान्य कार्यकर्त्यांना पडले आहेत.

वरवर बघता ही निवड लोकशाही पद्धतीने केली असल्याचा आव जरी भारतीय जनता पक्ष आणित असला तरी, अकोला जिल्ह्यात पक्षांतर्गत हुकूमशाही मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचे चित्र आहे. पक्ष संघटनेत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना धाक दाखवून त्यांना बाजूला करायचे व आपल्या मर्जीतील लोकांनाच विविध पदांची खैरात वाटायची असा एक कलमी हुकूमशाही पद्धतीचा खेळ सध्या मावळते जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांनी चालवला असल्याची दबक्या आवाजात सतत चर्चा कायमच सुरू असते..
पक्षाने त्यांची कार्यशैली बघून त्यांना प्रदेश सरचिटणीस पदी नेमले जरी असले तरी त्यांचे चित्त काही अकोला जिल्ह्याच्या बाहेर लागत नसल्याचे यावरुन दिसून येत आहे. सत्ताधारी पक्ष असल्याने जिल्ह्यातील विविध समित्यांवर नेमणूका करताना सुद्धा “मी करेल तो कायदा” या पद्धतीनेच नेमणुका सुरू आहेत. त्यांच्या या हुकूमशाही पद्धतीने वागण्याच्या कार्यशैलीला अनेक कार्यकर्ते कंटाळले असून सुद्धा त्यांच्यासमोर कोण बोलेल? अशी स्थिती आहे. त्यामूळे अनेकजण ‘मौनं सर्वार्थम् साधनम्’ अशी भूमिका घेऊन मूग गिळून स्तब्ध आहेत. परंतु त्याने पक्षाला फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक होईल असे दबक्या सुरात बोलले जात आहे. नुकत्याच जानेवारी फेब्रुवारी मध्ये पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत एकतर्फी विजय होईल असे वाटत असताना डॉ. रणजीत पाटील यांना अकोला जिल्ह्यातूनच सुरुंग लावण्यात आल्याची चर्चा आहे.

आमदार रणधीर सावरकर यांच्या मर्जीतल्या व होऊ घातलेल्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश अंधारे यांना संघ परिवारातील काही जेष्ठ मंडळींचा सुद्धा विरोध असल्याचे ऐकण्यात आहे. परंतु पक्षाच्या वरिष्ठांची बोटचेप्या व डोळेझाक करण्याच्या वृत्तीमुळे सध्या तरी अकोला जिल्हा भाजपा हा पक्षांतर्गत गटबाजींमुळे संपूर्णतः पोखरला गेल्याची स्थिती दिसून येत आहे. येत्या काळात होऊ घातलेल्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा याचा मोठ्या प्रमाणावर फटका भारतीय जनता पार्टीला बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: