अकोला : सामाजिक ॠण उतराईच्या दायित्वाचे पालन करीत सर्वच समाजांतील गरजूंच्या शैक्षणिक व वैद्यकीय सेवाकार्यात श्री.माहेश्वरी समाज सेवा संघाचे योगदान प्रशंसनीय आहे. सर्वच समाजांतील गरजू २० मोतीबिंदू रुग्णांना मदतीचा हात पुढे करून त्यांची मोफत शस्त्रक्रिया करुन देत, या कार्यात खारीचा वाटा उचलला,
अशी भावना मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या समाजबांधवांनी व्यक्त केली. श्री.माहेश्वरी समाज सेवा संघकडून डॉ.जुगल चिराणीया यांच्या रुग्णालयात पुरुषोत्तम गांवडे, मधुकर डोंगरे,प्रभा ढेकाळे, महेंद्र राठी, किशोरचंद्र बांगड्या, हरिश शर्मा, बालकिसन गप्पांची, शकुंतला राठी, सत्वशील खैरे इत्यादी गरजू रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.
यावेळी श्री. माहेश्वरी समाज सेवा संघाचे अध्यक्ष गजानन सोमाणी, ज्येष्ठ उपाध्यक्ष रमणभाई लाहोटी, सचिव राजेंद्र राठी, कोषाध्यक्ष नंदकिशोर बाहेती, सहकोषाध्यक्ष दिनेश भाला यांनी रुग्णांची भेट घेऊन वास्तपुस केली.
या सेवाकार्यात अत्यंत माफक दरात शस्त्रक्रिया करून सहकार्य करणारे डॉ.चिराणीया यांचा उपाध्यक्ष रमणभाई लाहोटी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
श्री. माहेश्वरी समाज सेवा संघाकडून माहेश्वरी समाजासोबतच इतर समाजातील गरजूंसाठी केल्या जात असलेले कार्य प्रेरणादायी आहे,असे डॉ.चिराणीया यांनी सांगितले. रुग्णांच्या वतीने गावंडे यांनी आभार मानले.