Sunday, November 17, 2024
Homeकृषीअकोला | डॉ. पं. दे. कृ. वि व कृषी विभागाचा उपक्रम...शिवारफेरी-२०२४ व...

अकोला | डॉ. पं. दे. कृ. वि व कृषी विभागाचा उपक्रम…शिवारफेरी-२०२४ व चर्चासत्राचा समारोप…

शेतकऱ्याला परवडणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे….पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अकोला, दि. २२ : (संतोषकुमार गवई)ज्ञान व संशोधन केवळ चार भिंतीत न राहता ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी शिवार फेरीसारखा उपक्रम स्तुत्य आहे. अशा उपक्रमाची व्याप्ती वाढवावी. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पारंपरिक अभ्यासक्रमाच्या चौकटीबाहेर जाऊन नवसंशोधनाला चालना द्यावी आणि शेतकऱ्याला परवडेल असे तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे, असे राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे सांगितले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागातर्फे आयोजित अकोला येथे शिवार फेरी व चर्चासत्राच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी प्रारंभी श्रीमती शालिनीताई विखे पाटील यांच्यासह शिवार फेरीत सहभागी होऊन पीक प्रात्यक्षिकांची पाहणी केली. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर,आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी, कार्यकारी समितीचे सदस्य विठ्ठल सरप पाटील, हेमलता अंधारे यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याचे जीवनात परिवर्तन करण्यासाठी त्याला परवडेल असे तंत्रज्ञान, साधने मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाने नवसंशोधनाला चालना द्यावी. कृषी विज्ञान केंद्रे ही संशोधनाची रोल मॉडेल व्हावीत. शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा व्यापकपणे वापर करावा. पॉलीहाऊससारखे तंत्रज्ञान गरजूंपर्यंत पोहोचले पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, दुग्ध उत्पादनात विदर्भ मागे असल्याचे लक्षात घेऊन शासनाकडून 19 जिल्ह्यांमध्ये विशेष योजना राबविण्यात येत आहे. विदर्भ दुग्ध उत्पादनात स्वयंपूर्ण व्हावा असा प्रयत्न आहे. मदर डेअरीच्या माध्यमातून गावोगाव दूध संकलन केंद्रे निर्माण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील पशुधन, तेथील दुग्धोत्पादन, अडचणी आदींबाबत सर्वेक्षण करण्यासाठी कृषी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. शिवार फेरीचा उपक्रम कौतुकास्पद असून, त्याची व्याप्ती वाढविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे पशुवैद्यकीय महाविद्यालय, 37 तलाठी व 12 मंडळ कार्यालयासाठी निधी मंजूर झाल्याचे आमदार श्री. सावरकर यांनी सांगितले.कुलगुरू डॉ. गडाख यांनी शिवार फेरी व विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. किशोर बिडवे यांनी सूत्रसंचालन केले.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: