आकोट- संजय आठवले
अकोला जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यातील आपले वर्चस्व कायम राखीत ७ पैकी ४ पंचायत समित्या निर्विवाद काबीज केल्या असून तांत्रिक बाबीमुळे अकोला पंचायत समितीवर भाजपचा ध्वज फडकला आहे. बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये सेना बंडखोर उमेदवारास आपल्याकडे खेचून तर आकोट येथे उद्धव सेनेला मदत करून भाजपने बाजी मारली आहे.
पाच वर्षातील अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने उर्वरित अडीच वर्षांकरिता अकोला जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती पदांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये आपला दबदबा कायम राखत वंचित आघाडीने मूर्तिजापूर, पातुर, बाळापूर व तेल्हारा या पंचायत समित्यांवर आपला ध्वज फडकविला आहे. पातुर पंचायत समिती मागील खेपेला शिवसेनेकडे होती. परंतु यावेळी या ठिकाणी अतिशय चुरस निर्माण झाली. दोन्ही पक्षांना समसमान मते मिळाल्याने येथे ईश्वर चितठ्ठीचा आधार घ्यावा लागला. ह्यात वंचितचे सभापती व उपसभापती विजय झाले आहेत.
मुर्तीजापुर येथे महाविकास आघाडीचे आपसात बिनसल्याने उद्धवसेना वंचितच्या पाठीशी उभी ठाकली. त्यामुळे या ठिकाणी वंचित ने सभापती पद तर उद्धवसेनेने उपसभापती पद काबीज केले आहे. अकोला पंचायत समितीमध्ये आरक्षित संवर्गातील उमेदवार केवळ भाजपकडे असल्याने येथे भाजपचा परचम आपोआपच फडकला आहे. उपसभापती मात्र वंचित ने कायम राखला आहे. आकोट मध्ये भाजप, काँग्रेस व प्रहारची मोट बांधून शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाने बाजी मारली आहे. तर उपसभापती पद भाजपच्या पदरात पडले आहे.
बार्शीटाकळी येथे शिवसेनेतून उमेदवार आयात करून भाजपने त्या उमेदवाराला सभापती पद तर आपल्या कार्यकर्त्याला उपसभापती पद देण्यात यश प्राप्त केले आहे. या ठिकाणी सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला भरघोस सहकार्य केले.
जिल्ह्यातील या सातही पंचायत समिती सभापती, उपसभापती पदी विजयी उमेदवारांची नावे येणेप्रमाणे- अकोला- सभापती सुलभा सोळंके भाजप, उपसभापती अजय शेगांवकर वंचित, बार्शिटाकळी- सभापती सुनंदा मानतकार सेना बंडखोर, उपसभापती संदिप चौधरी भाजप, तेल्हारा- सभापती आम्रपाली गवारगुरू वंचित, उपसभापती किशोर मुंदडा वंचित, बाळापूर- सभापती शारदा सोनटक्के वंचित,उपसभापती राजकन्या कवरकार वंचित, पातूर- सभापती सविता टप्पे वंचित, उपसभापती इमरान खान वंचित, आकोट- सभापती हरदिनी वाघोडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपसभापती संतोष शिवरकर भाजप, मूर्तिजापूर- सभापती आम्रपाली तायडे वंचित, उपसभापती देवाशिष भटकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.