आकोट- संजय आठवले
आकोट शहरातून गौण खनिजाची वाहतूक करणारे वाहन उपविभागीय अधिकारी यांनी पोलिसात जमा केल्यानंतर, त्याच वाहन क्रमांकाची ईटीपी पास बनवून पाच वेळा याच वाहनाद्वारे वाहतूक केल्याचे दर्शविण्यात आले. परंतु त्याबाबत कारवाई करण्याऐवजी अकोला जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी बेनिफिट ऑफ डाऊट या सदराखाली सदर वाहन सोडल्याने आणि त्यावर विधिमंडळात उपस्थित केलेल्या प्रश्नांची दिशाभूल करणारी उत्तरे दिल्याने विधिमंडळाची दिशाभूल केल्याचा तसेच या संदर्भात जिल्हाधिकारी अकोला यांना अनभिज्ञ ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासंदर्भात सविस्तर असे की, माहे सप्टेंबर २०२२ मध्ये आकोट शहरातून गौण खनिजाची वाहतूक करताना एक वाहन उपविभागीय अधिकारी यांनी पकडले. त्या वाहनाच्या वाहतूक पास मध्ये गडबड असल्याचे निदर्शनास आल्याने ते वाहन पोलिसात जमा करण्यात आले. मात्र त्यानंतरही त्याच वाहन क्रमांकाची वाहतूक पास बनवून त्याच वाहनाद्वारे पाच वेळा वाहतूक करण्यात आल्याचे ऑनलाइन तपासणीत आढळून आले. त्यावर कारवाई करणे संदर्भात जिल्हाधिकारी अकोला यांनी उपविभागीय अधिकारी आकोट यांना आदेशित केले. त्यांचे वतीने तहसीलदार आकोट यांनी काही जाब जबाब घेऊन आपला अहवाल जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना सादर केला. त्यावर बेनिफिट ऑफ डाऊट या सदराखाली जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी सदर वाहनावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता ते वाहन सोडून दिले. याबाबत वृत्तपत्रातून ओरड झाली. त्याची दखल घेऊन आमदार सुभाष धोटे राजुरा, अमीन पटेल मुंबादेवी, असलम शेख मालाड पश्चिम व जितेश अंतापुरकर देगलूर या चार आमदारांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केले.
मात्र अकोला जिल्हा खनिकर्म अधिकारी यांचे कडून या प्रश्नांची दिशाभूल करणारी उत्तरे देण्यात आली. त्यामुळे विधिमंडळास वास्तविक परिस्थिती अवगत होऊ शकली नाही असा आरोप विठ्ठल गावंडे यांनी महसूल व वन विभागाचे कक्ष अधिकारी स.ग. मोहिते यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीच्या प्रतिलिपी त्यांनी तारांकित प्रश्नांची संबंधित चारही आमदारांना पाठविल्या आहेत. या तक्रारीत त्यांनी असेही म्हटले आहे की, या प्रकरणात रॉयल्टीचे पैसे शासनास मिळाले असले तरी दगडाची रॉयल्टी मुरुमाला, मुरुमाची वाळूला, वाळूची गिट्टीला चालत नाही. तशीच एका वाहनाची वाहतूक पास दुसऱ्या वाहनास चालत नाही. हे माहीत असूनही अकोला जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिती चाफले यांनी सदर खणिपट्टाधारकाला पाठीशी घालण्याकरिता मावनीय चूक ग्राह्य धरून बेनिफिट ऑफ डाऊट या सदराखाली सदर वाहन सोडून दिले आहे. त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी व कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.