अकोला – शारदीय नवरात्रोत्सवाला ३ ऑक्टोबर पासून सुरूवात झाली. यंदाच्या नवरात्री उत्सवासाठी अकोला विभागात एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने भाविकांसाठी १२ ऑक्टोबर पर्यंत विशेष नवरात्र देवी दर्शन यात्रा सुरू केली आहे.
यात्रा ही माफक दरात एसटीने उपलब्ध करून दिली असून या प्रवासाचा भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
एसटी महामंडळाने देवी भक्तांसाठी अत्यंत माफक दरात ही योजना सुरू केली आहे. गतवर्षीसुद्धा ही योजना राबविण्यात आली होती. योजनेला जिल्ह्यातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. भाविकांची मागणी पाहता, यंदाही भाविकांना देवी दर्शन घडविण्यात येणार आहे. जिल्ह्यात अनेक प्रसिद्ध असे देवीची मंदिरे आहेत.
या विशेष नवरात्र देवी दर्शन यात्रेसाठी पूर्ण प्रवास भाडे २६५ रुपये आकारले जाणार आहे, तर महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसाठी केवळ १३० रुपये भाडे आहे. अंबादेवी अमरावती, मुऱ्हादेवी अंजनगाव सुर्जी आणि ढगादेवी कुरणखेड, काटेपूर्णा दर्शनासाठी ३७० रुपये आणि महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसाठी केवळ १८५ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.
या मंदिरांची दर्शन यात्रा
यात्रेदरम्यान भाविकांना अंबादेवी अमरावती, मुऱ्हादेवी ता. अंजनगाव सुर्जी आणि ढगादेवी काटेपूर्णा हा एक मार्ग, तर बाळादेवी बाळापूर, रेणुकादेवी पातूर, रूद्रायणी देवी चिंचोली, कालंका माता बार्शीटाकळी, आसरा माता दोनद हा दुसरा मार्ग राहणार आहे.
आरक्षण सुविधा
यात्रेसाठी बसेस जुने बसस्थानक आगार क्रमांक १ टॉवर चौक येथून सकाळी ८.३० वाजतापासून सुटणार आहेत. भाविकांनी जुने बसस्थानक येथून सकाळी १० ते ५ वाजेदरम्यान बसगाडीचे आरक्षण करून घ्यावे, असे एसटी महामंडळाने कळविले आहे.