अकोला : नवदुर्गा महोत्सवात रास दांडियाची धूम मोठ्या प्रमाणात असून ठीकठिकाणी नवदुर्गा मंडळांनी गरबा महोत्सव आयोजित केले आहेत, तर अश्या ठिकाणी चिडीमार लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते असाच एक प्रकार अकोल्यात समोर आला आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची चार जणांना महिलांचे फोटो घेतांना रंगेहात पकडले असून त्यांना जागेवरच प्रसाद देण्यात आला, त्यांनी २५० वर महिलांचे मोबाईलमध्ये फोटो काढल्याचे समोर आले असून या चौघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
शहरातील रिगल टॉकीज परिसरातील राम नगर नवदुर्गा उत्सव मंडळाच्या देवीजवळ पुजेसाठी गरबा व दांडीया खेळण्यासाठी आलेल्या महिलांचे उत्तर प्रदेशातून छताच्या ‘पीओपी’चे बांधकाम करण्यासाठी आलेल्या चार जणांनी छायाचित्र काढल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री समोर आल्याने शहरात खळबळ उडाली असून सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे रात्री तक्रार दाखल करण्यात आली. राम नगर नवदुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या चारही जणांना छायाचित्र काढतांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्या मोबाइलमध्ये २५० पेक्षा अधिक महिलांचे छायाचित्र असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
उत्तर प्रदेशातील चार जण छताच्या ‘पीओपी’चे कारागीर असून ते राम नगर परिसरातील लढ्ढा नामक व्यावसायिकाच्या छताच्या ‘पीओपी’चे मंगळवारी काम करीत असतानाच महिला व युवतींचे छायाचित्र काढत असल्याचे या परिसरातील काही युवकांच्या लक्षात आले.
याच दरम्यान ते राम नगर नवदुर्गोत्सव मंडळामध्ये येणाऱ्या महिलांचे छायाचित्र काढत असल्याचा संशय शिवसैनीक सागर भारुका यांना आला त्यांनी चारही जणांचे मोबाइल घेउन थेट सिटी कोतवाली पोलिस स्टेशन गाठवून तक्रार दाखल केली आहे.