आकोट – संजय आठवले
गांधीग्राम येथील पूल क्षतिग्रस्त झाल्याने अकोला आकोट मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आल्या नंतर त्यावर अकोला व आकोट येथून गांधीग्राम व गांधीग्राम येथून अकोला आकोट बस फेऱ्या सुरू करण्यास परिवहन मंडळाने दिलेली मंजुरी तूर्तास थांबविण्यात आली असून दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर याप्रकरणी निर्णय होण्याची शक्यता आहे.
गांधीग्राम येथील पूल क्षतीग्रस्त झाल्यावर अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कोणतीही दुर्घटना होऊ नये याकरिता हा पूल वाहतुकीस बंद केला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे निरीक्षण कार्य सुरू केले होते.
हे कार्य सुरू असतानाच शुभांगी शिरसाट विभाग नियंत्रक, राज्य परिवहन अकोला यांनी अकोला व आकोट आगार व्यवस्थापकांची संयुक्त बैठक घेऊन अकोला ते गांधीग्राम व गांधीग्राम ते अकोला आणि आकोट ते गांधीग्राम व गांधीग्राम ते आकोट अशा सलग बस फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याकरता क्षितिग्रस्त पुलावरून पादचाऱ्यांना येण्या जाण्याकरिता निवासी जिल्हाधिकारी अकोला यांचेकडून मौखिक परवानगी घेण्यात आली.
त्यानुसार जारी करण्यात आलेल्या आदेशान्वये अकोला व आकोट आगारानी ह्या बस फेऱ्या सुरू करण्यासंदर्भात पूर्ण तयारी केली होती. ह्या मार्गे धावणाऱ्या बसेस व त्यावर वाहक- चालक ही नियुक्त करण्यात आले होते. परंतु बसेस सुरू करण्याच्या पूर्वसंध्येलाच जिल्हाधिकारी अकोला कार्यालयाने या बस फेऱ्या रोखण्याचे आदेश दिले आहेत. या पुलाचे मजबुती संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने आपला अहवाल दिल्याने कदाचित या बस फेऱ्या रोखण्यात आल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत शासकीय कार्यालयांना दिवाळी सणाच्या सुट्ट्या आहेत. ही कार्यालये थेट २७ ऑक्टोबर रोजी उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यानंतरच या बस फेऱ्या संदर्भात काहीतरी निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु पूलाचे मजबुती संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने अनुकूल अहवाल दिल्यासच हा निर्णय होऊ शकतो.
हा अहवाल प्रतिकूल आल्यास मात्र या रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंदचा आदेशच कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे २७ ऑक्टोबर नंतर या संदर्भात काय निर्णय घेतला जातो, याकडे साऱ्यांच्या नजरा लागला आहेत.