अकोला – संतोषकुमार गवई
अकोला – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे आदिवासी मुले व मुलींसाठी एकूण 6 वसतिगृहे आहेत. त्याची प्रवेशप्रक्रिया दि. 12 जूनपासून सुरू होत आहे. त्यात अकोला शहरातील चार वसतिगृहात इयत्ता दहावी व बारावीच्या पुढील अभ्यासक्रमासाठी, तसेच मूर्तिजापूर व तेल्हारा येथील दोन वसतिगृहांत इयत्ता सातवी, दहावी व बारावीच्या पुढील अध्ययन करणा-या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. प्रवेशासाठी swayarn.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरावा. त्याची प्रत व आवश्यक दस्तऐवजासह संबंधित वसतिगृहातील रिक्त पदासाठी दि.30 जूनपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
अकोला शहरात कृषीनगर येथे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र. 1, किर्तीनगर येथे मुलांचे वसतिगृह क्र. 2, तसेच तोष्णीवाल लेआऊट येथे मुलींचे वसतिगृह क्र. 1, दीपक चौक येथे मुलींचे वसतिगृह क्र. 2 आहे. मूर्तिजापूर येथील सिरसो गायरानात आणि तेल्हारा येथे मनतकार पेट्रोलपंपाजवळ आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह आहे.
प्रवेशाचे निकष : विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, त्याच्याकडे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, चालू वर्षातील तहसीलदार यांचा मुळ उत्पन्नाचा दाखला, स्वतःचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते आणि ते आधारकार्ड व मोबाईलशी संलग्न असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या, तालुक्याच्या ठिकाणी आहे, तिथे त्याचे पालक रहिवासी नसावेत.