अकोला – महापालिका आयुक्तांची खोटी सही मारून गुंठेवारी विकास नियमानुकुलचा आदेश पारित केल्याची तक्रार महापालिकेच्या वतीने करण्यात आली होती. सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी आरोपी पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
सविस्तर वृत्त असे की, सण 2006 साली महानगरपालिकेद्वारे संदीप मधुकर गावंडे क.अभियंता महानगरपालिका यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अकोला येथे लेखी तक्रार दिली की, आरोपी आराधना गौतम, अभिषेक गौतम, समाधान खंडारे यांनी संगनमत करून महानगरपालिकेची गुंठेवारी विकास नियमाकूलचा अर्ज महानगरपालिकेत केला होता.
परंतू सदर अर्जाच्या आदेशाचे अवलोकन केले असता असे लक्षात आले की, आयुक्तांच्या खोट्या सह्या करून सदरचा खोटा आदेश तयार केलेला आहे. संगीता सुहास जैन हिने अकोला महानगरपालिकेला तक्रार देऊन सदरची बाब कळल्यामुळे महानगरपालिकेने पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथे दि.05/10/2006 रोजी आरोपींविरुद्ध 420,468,471 भा.द.वि.कलम प्रमाणे गुन्हा नोंदविला.
सदर खटल्याच्या सुनावणी दरम्यान आरोपी अभिषेक गौतम यांचे अधिवक्ता अँड. सुमीत महेश बजाज व अँड. वर्षा सदार यांनी युक्तिवाद केला की तक्रारकर्ता संगीता जैन ही आरोपी 1 ते 3 यांची जवळची नातेवाईक असून त्यांचे दिवाणी व फौजदारी खटले न्यायालयात आहे. तसेच मूळ तक्रारकर्त्याने केलेली तक्रार ही सिद्ध अभिलेखखावर आणलेली नाही.
म्हणून आरोपीच्या अधिवक्ताचे युक्तिवाद ग्राह्य धरून महानगरपालिकेने दाखल केलेल्या खटल्यात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सदर निर्णय मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती शीतल एस. बांगड यांच्या न्यायालयाने दिला तर आरोपीतर्फे अधिवक्ता अँड.सुमीत महेश बजाज व अँड.वर्षा सदार यांनी काम पाहिले.