अकोला जिल्ह्यात आलेल्या दमदार पावसाने एका १० वर्षीय चिमुकल्याचा जीव घेतला, रात्री झालेल्या दमदार पावसाने शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते, या पावसाचा आनंद घेण्यासाठी लहान लेकर मंडळी आपल्याच घरासमोर पाण्यात खेळत असताना 10 वर्षाचा मुलगा वाहून गेल्याची घटना बुधवारी खैर मोहम्मद प्लॉट परीसरात घडली आहे. वाहून गेलेल्या मुलाचे नाव जियान अहमद इक्बाल अहमद असल्याची माहिती मिळाली असून मुलाचा शोध लागला नसून शोध व बचाव पथक रात्रीपासून कामाला लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खैर मोहम्मद प्लॉट येथे पावसाच्या पाण्यात जियान आणि त्याचे मित्र घराबाहेर खेळत तर इतरही मुले रस्त्यावर खेळत होती. दरम्यान जीयान याची चप्पल नाल्याच्या पाण्यात गेली. चप्पल वाहत असताना ती पकडण्यासाठी जीयान त्यामागे पाण्यातून जावू लागला. पाण्याचा आणि नाल्याचा अंदाज न आल्याने जियान पाण्यात वाहत जावू लागला.तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच जुने शहर पोलिस आणि मनपा अग्निशमन विभागाचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
रात्रीचा अंधार आणि मुसळधार पावसामुळे शोध मोहिमेत अडथळे येत आहे. मात्र युद्धपातळीवर शोध मोहीम काम सुरू आहे. दरम्यान परिसरातील एका सिसीटिव्ही मध्ये बालक वाहत गेल्याचा धक्कादायक घटनाक्रम दिसत आहे. संपूर्ण जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून सुरू असलेला संततधार पाऊस आज बुधवारी सकाळपर्यंत सुरु असल्याने अकोला जिल्ह्यातील अनेक मार्गावरील नाल्याला पूर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. याशिवाय गांधीग्रामच्या नवीन पुलावरून पुराचे पाणी वाहून गेल्याने अकोट मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे.
याशिवाय पाण्याची पातळी वाढली असल्याने नद्दुया थडी भरून वाहत होत्या. नदीच्या पुराचे पाणी काठालगतच्या शेतांत पाणी साचले. जिल्ह्यात पावसाने ग्रामीण भागातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. याशिवाय नुकत्याच पेरणी झालेल्या शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ११.३ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे.