अकोला : गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पाऊस जिल्ह्यात धुमाकूळ घालतोय, काल रात्री आलेल्या जोरदार पावसासह सुसाट वाहणाऱ्या वादळाने ७ बळी घेतले. बाळापुर तालुक्यातील पारस येथील समर्थ बाबूजी महाराज संस्थान मंदिराच्या छतावर एक मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने झालेल्या दुर्घटनेत ७ भाविकांचा मृत्यू झाला तर 30 जण गंभीरपणे जखमी झाले आहेत. जखमींना अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पारस गावात शोककळा पसरली आहे.
बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज संस्थान येथे दर रविवारी जिल्हाभरातील भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणी रात्री १० वाजता ‘दु:ख निवारण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या तयारीत मंदिराच्या बाजूच्या सभामंडपात भाविक एकत्र आले होते. दरम्यान, सायंकाळी वातावरणात बदल होऊन सोसाट्याचा वारा सुटला. या वादळी वाऱ्यामुळे मंदिराच्या बाजूला असलेले लिंबाचे झाड सभामंडपावर कोसळले. सभामंडप व झाड अंगावर पडल्याने शेकडो भाविक दाबल्या गेल्याने एकच खळबळ उडाली.
पाऊस आणि वारा यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळा येत होता.तातडीने जेसीबी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू झाले. मात्र तोपर्यंत ७ भाविकांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच बाळापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. जवळपास ३० जण गंभीर जखमी झालेल्या भाविकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.