आकोट- संजय आठवले
सर्वत्र पसरलेल्या गारव्यात दिवाळी सण साजरा करण्याची धामधूम सुरू झाली असतानाच आकोट शहरात स्वाईन फ्लूची लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गत १५ दिवसांपासून शहरात डुकरे मृत्युमुखी पडण्याचे सत्र सुरू झाल्याने हा संशय बळावत आहे. यावर दिवाळीच्या सुट्टीनंतर आकोट पालिका डुकरे व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणार असल्याचे पालिकेद्वारे सांगण्यात आले आहे.
गत पंधरा दिवसांपासून आकोट शहरात डुकरांच्या मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दर दिवशी २५ ते ५० डुकरे मृत्युमुखी पडत आहेत. आरंभी या घटनेची दखल घेण्यात आली नाही. परंतु हे सत्र सुरूच असल्याने अखेरीस मृत डुकरांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी डुकरांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचा संशय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्याची खातरजमा होणे करिता शवविच्छेदन अहवाल पुणे प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे.
यादरम्यान पालिकेद्वारे खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात झालेली आहे. शहरात मोकाट फिरणाऱ्या डुकरांची मालकी सिद्ध होणेकरिता पालिकेने सूचना काढल्या आहेत. मात्र अद्यापही डुकरे आपली असल्याचे सांगण्यास कुणीच पुढे आलेले नाही. अर्थात ही डुकरे कुणाच्या ना कुणाच्या मालकीचीच आहेत. परंतु कायदेशीर कारवाई होण्याचे भीतीने या डुकरांवर कुणीही मालकी हक्क सांगण्यास धजावलेले नाही. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीनंतर ही डुकरे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्याकरिता परप्रांतीय कंत्राटदाराशी पालिकेची बोलणी सुरू आहे.
ही बोलणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कारवाईस सुरुवात केली जाणार आहे. ही डुकरे पकडताना कुणाचा अडथळा येऊ नये याकरिता डुकरे पकडणाऱ्या पथकासोबत पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. याच प्रकारे मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्याचे पालिकेच्या विचाराधीन आहे. वास्तविक एका वर्षापूर्वी पालिकेद्वारे मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र अवघ्या काही दिवसातच ही मोहीम बारगळली.
ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नर कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्यानंतर या कुत्र्यांना किमान पंधरा दिवस सक्त निगराणीखाली ठेवावे लागते. त्याकरिता मोठ्या आणि बंदिस्त जागेची आवश्यकता आहे. गेल्या वेळेस हा श्वान कॅम्प दर्यापूर मार्गावरील पालिकेच्या घनकचरा साठवणुकीचे ठिकाणी तयार करण्यात आला होता. तेथे चौकीदाराकरिता बांधलेल्या लहानशा खोलीत निर्बिजीकरण केलेली चार-दोन कुत्री ठेवण्यात आली. परंतु नंतर याबाबतीत तत्कालीन अध्यक्ष हरिनारायण माकोडे आणि पालिका प्रशासनाच्या उदासीनतेने ही मोहीम रातोरात थंड बस्त्यात टाकली गेली.
त्यामुळे यावेळी पालिकेला अतिशय गंभीरतेने ही मोहीम राबविणे आवश्यक आहे. कारण शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर कमाली पलीकडे वाढलेला आहे. त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. ही कुत्री अनेकांना चावतही आहेत. त्यामुळे ही निर्बिजीकरण मोहीम पूर्ण जबाबदारीने पार पाडणे ही काळाची गरज आहे. म्हणून पालिका या मोहिमा केव्हा सुरू करते आणि कशा राबविते याकडे महा व्हाईस लक्ष ठेवून आहे.