अजित पवार भाजपात जाणार?…या चर्चेने राज्यात राजकीय खळबळ उडवून देणाऱ्या बातम्यांना आता काही प्रमाणात विराम मिळाला असून अजित पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आपण राष्ट्रवादीत आहोत आणि राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. ‘मुद्द्यांवरून लक्ष वळवण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जात आहेत’, असं अजित पवार म्हणाले.
आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनातच राष्ट्रवादीत काम करत आहोत. बातम्यांमुळे कार्यकर्त्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नये, मला आमदार कामानिमित्त भेटले दुसरा अर्थ नाही. आम्ही राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. पक्ष जो निर्णय घेईल, मी त्याच्यासोबत असेन, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. या वृत्तांमध्ये तथ्य नाही, असे शरद पवार म्हणाले. अजित पवार यांनी एकही बैठक बोलावली नाही, ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि हे सर्व त्यांच्याच मेंदूची उपज आहे.
मी उपमुख्यमंत्री पद गेल्यानंतर बदल केला. पण ट्विटर काय सारखा झेंडा लावून ठेऊ का? आमचं वकील पत्र काय दुसऱ्या पक्षांनी घेतलं आहे का? भाजपसोबतच्या जाण्याच्या चर्चाना तथ्य नाही असेही अजित पवार यांनी म्हंटलं आहे.
माझ्या बाबतच्या चर्चा थांबवा, त्याचा आता तुकडा पाडा असेही आवाहन अजित पवार यांनी केले आहे. शरद पवार यांनी स्वतः सांगितले आहे की यामध्ये कुठलेही तथ्य नाही. माझ्या भूमिकेवर दुसऱ्या पक्षातील नेत्यांनी बोलू नये. शिंदे गटाच्या नेत्यांना बोलण्याचा अधिकार नाही.
सुप्रिया सुळे म्हणाल्या मोठी गोष्ट
प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच आपल्या एका वक्तव्यात म्हटले आहे की, येत्या १५ दिवसांत दोन मोठे राजकीय स्फोट होणार आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी ‘यापैकी एक बॉम्बस्फोट दिल्लीत आणि एक महाराष्ट्रात होईल’ असं म्हटलं आहे. मात्र, त्यांनी याबाबत फारशी माहिती दिली नाही. अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या अटकेवर सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, हा प्रश्न तुम्ही अजित दादांना का विचारत नाही? मला याबाबत काहीच माहिती नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्याकडे खूप काम आहे, त्यामुळे मी या फालतू गोष्टींमध्ये माझा वेळ वाया घालवत नाही.