राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल बुधवारी संध्याकाळी दिल्लीत पोहोचले. यानंतर दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शहा यांच्याशी चर्चा झाली असून यामध्ये खाते वाटपासह मंत्रिमंडळाचा फार्मूलाही ठरला असल्याचे सूत्राकडून माहिती मिळत आहे तर फार्मूला काय असणार?…
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी तासभर चर्चा केली. या बैठकीत दोन्ही प्रश्न निकाली लावण्यात आले आहेत. या बैठकीत मंत्रिपदाचा 4-4-2 असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार जागा वाटप होणार आहे. याआधी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, 4-4-2 फार्म्युल्यानुसार भाजपला चार मंत्रिपद मिळणार आहेत. त्यानंतर शिंदे गटालाही चार मंत्रिपद मिळणार असून राष्ट्रवादीला दोन मंत्रिपद मिळणार आहेत. म्हणजे एकूण 10 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. नव्या फॉर्म्युलानुसार भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी चार मंत्रिपद मिळणार आहेत. या दोन्ही गटाचे आधीच मंत्रिमंडळात प्रत्येकी 10 मंत्री आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांची संख्या प्रत्येकी 14 होणार आहे. राष्ट्रवादीचे मंत्रिमंडळात 9 मंत्री आहेत. त्यांना आणखी दोन मंत्रीपदे मिळणार असल्याने त्यांच्या मंत्र्यांची संख्या 11 होणार आहे.
आजच शपथविधी
दरम्यान, दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटल्याने आज किंवा उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. स्वत: प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिली. काही आमदार गावाला आहेत. ते जर संध्याकाळपर्यंत मुंबईत येऊ शकले तर मंत्रिमंडळाचा विस्तार आजच होऊ शकतो, असंही सांगितलं जात आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चिदंबरम यांचा टोला
त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी ट्विट करून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा समाचार घेतला. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आपले सरकार ट्रिपल इंजिनचे सरकार असल्याचा दावा करत आहेत. पण ट्रिपल इंजिन सरकारची स्थिती 100 मीटरची शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन पायांच्या प्राण्यासारखी दिसते.
त्यांनी पुढे लिहिले की, महाराष्ट्रातील नऊ नवीन मंत्र्यांकडे कोणतेही काम नाही कारण त्यांना अद्याप खात्यांचे वाटप झाले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य 20 मंत्र्यांपैकी एकही मंत्रीपद सोडण्यास तयार नाही. माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम यांनी यावर उपाय सुचवला की महाराष्ट्र सरकारने नऊ नवीन मंत्री खात्याशिवाय मंत्री असतील अशी घोषणा करावी.