Monday, December 23, 2024
Homeकृषीराज्यात डिसेंबर २२ पर्यंत एक लाख कृषी पंपाना प्राधान्याने वीज जोडणी देण्याचे...

राज्यात डिसेंबर २२ पर्यंत एक लाख कृषी पंपाना प्राधान्याने वीज जोडणी देण्याचे उध्दीष्ट…संचालक (संचलन) श्री.संजय ताकसांडे

अमरावती,दि.१६ नोव्हेंबर २०२२; पैसे भरून प्रलंबित असलेल्या राज्यातील एक लाख कृषीपंपाना डिसेंबर २०२२ पर्यंत वीज जोडणी देण्याचे उध्दीष्ट आहे.त्यानुसार प्राधान्याने प्रयत्न झाले पाहिजे असे निर्देश महावितरणचे संचालक (संचलन) श्री. संजय ताकसांडे यांनी दिले. तसेच सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी देखील थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

येथील ‘प्रकाशसरिता’ सभागृहात आयोजित अमरावती परिमंडलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रादेशिक संचालक श्री.सुहास रंगारी, मुख्य अभियंता सौ. पुष्पा चव्हाण,उप महाव्यवस्थापक (मातं) श्री.प्रमोद खुळे, अधीक्षक अभियंता श्री.दिलीप खानंदे (अमरावती) श्री. सुरेश मडावी (यवतमाळ),श्री.दिपक देवहाते ,श्री.हरीश गजबे,श्री वाय.डी.मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संचालक (संचलन) श्री. संजय ताकसांडे म्हणाले,की अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ० ते ३० मीटर अंतर पैसे भरून असलेल्या ७१ कृषी पंपाना पुढील दोन दिवसात वीज जोडण्या देण्याच्या सुचना यावेळी त्यांनी केल्यात.तसेच उपलब्ध असलेल्या अनुक्रमे १६ आणि ११ कोटीच्या आकस्मिक निधीच्या कामाचे शंभर टक्के आदेश काढून ३१ ते २०० मीटर अंतर असलेल्या वीज जोडणी देणे , तसेच कृषी आकस्मिक निधी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे .त्याचबरोबर २०१ ते ६०० मीटर अंतरापर्यंत असलेल्या वीज जोडणीसाठी जिल्हा पातळीवर निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यादृष्टिने वीज जोडणीच्या कामाला गती देण्याच्या सुचना यावेळी त्यांनी केल्यात.

ग्राहकांना खात्रीशीर वीज पुरवठा करणे ही महावितरणची जबाबदारी आहे.त्यामुळे वीज यंत्रणाची वेळोवेळी देखभाल दुरूस्ती करण्यात यावी.वितरण हानी जास्त असलेल्या परिमंडळातील १३ वाहिन्यांवर विशेष लक्ष देऊन त्या वाहिन्यांची वितरण हानी कमी करण्यासाठी आणखी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच सध्यास्थितीत वीज मीटर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.तसेच पुढील काळात आवश्यकतेनुसार मीटर उपलब्ध होणार आहे.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाची अडवणूक होता कामा नये अश्या स्पष्ट सुचना यावेळी त्यांनी केल्यात.

मुख्य मंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांचे दिवसा वीज पुरवठ्याचे स्वप्न पुर्ण होणार आहे. शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेत अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा मिळाल्या पाहिजेत यासाठी मा.जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून जागा मिळविण्यात याव्यात अशा सुचना अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना केल्यात.

या आढावा बैठकीला परिमंडळ कार्यालयातील सर्व विभाग प्रमुखासह अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते, कार्यकारी अभियंता चाचणी,कार्यकारी अभियंता स्थापत्य यांच्यासह उपविभागीय अभियंते, उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: