Friday, November 22, 2024
Homeकृषीकृषी धोरण; ३१ मार्च पर्यंतच घेता येणार लाभ...

कृषी धोरण; ३१ मार्च पर्यंतच घेता येणार लाभ…

व्याज,विलंब आकार माफ, मुळ थकबाकीतही ३० टक्के सवलत

अमरावती – कृषिपंपाचे वीजबिल आज भरू, उद्या भरू असे म्हणत कृषी धोरणाचे दोन वर्ष निघून गेले. परंतु महावितरणच्या कृषी वीज धोरणाअंतर्ग व्याज,विलंब आकार माफ, मुळ थकबाकीत ३० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ १० दिवस उरले आहेत. येत्या ३१ मार्चला ३० टक्के माफीचीही मुदत संपणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता कृषी धोरणात सहभागी होऊन ३० टक्के सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

महावितरणच्या वतीने कृषी अभियानाअंतर्गत कृषी धोरण २०२० राबविण्यात येत आहे. तीन वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या या धोरणाचे दुसरे वर्षही येत्या ३१ मार्चला संपणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी थकबाकीमुक्तीची सवलतही ३१ मार्चपर्यंतच राहणार आहे. कृषी धोरणात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज व विलंब आकारत माफी,तर मुळ थकबाकीतही ३० टक्के सुट देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महावितरणच्या कृषी धोरणाबाबत माहिती देऊन सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.धोरण पोहोचले आहे,परंतु ‘बिल आज भरू, उद्या भरू’च्या मानसिकतेमुळे दोन वर्ष निघून गेले असून, आता फक्त दुसऱ्या वर्षाचे १० दिवस उरले आहेत. अमरावती जिल्ह्यात धोरणापूर्वी शेतीची थकबाकी १ हजार ३०४ कोटीच्या घरात होती.दंड-व्याजातील सूट, निर्लेखन व बिल दुरुस्ती समायोजनातून ५१० कोटी माफ झाले आहेत.

त्यामुळे सुधारित थकबाकीच्या ७९४ कोटीच्या थकबाकीतही ३० टक्के थकबाकी माफ होत असल्याने,शेतकऱ्यांना ७० टक्के हिश्श्यापोटी सुधारीत थकबाकीच्या केवळ ५५५ कोटी आणि सप्टेंबर २०२० पासूनचे चालू बिल भरायचे आहेत.

योजनेसाठी पात्र असलेल्या १ लाख ३८ हजार ५९१ शेतकऱ्यांपैकी ५३ हजार ५४१ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला असला तरी केवळ ९ हजार ७७ शेतकऱ्यांनीच योजनेचा संपूर्ण लाभ घेतला आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांनी फक्त कारवाई टाळण्यासाठी जुजबी रक्कम भरलेली आहे. वसूल रक्कमेतील ३३ टक्के रक्कम गाव पातळीवर व ३३ टक्के रक्कम जिल्हा पातळीवर विजेच्या पायाभूत कामांत वापरली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: