आकोट – संजय आठवले
तेल्हारा तालुक्यातील ग्राम मालपुरा येथील शेतीचे वादातून सख्ख्या बहिणीनेच आपले दोन भाऊ आणि त्यांच्या दोन तरण्या मुलांचा आपल्या पती व मुलांच्या सहाय्याने केलेल्या खून प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशी मध्ये बहिण व तिचे परिवारावर खुनाचा गुन्हा शाबित झाला आहे.
या प्रकरणात आकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने फैसला राखून ठेवला असून दिनांक ३ मे रोजी यावर फैसला देण्यात येणार आहे. दरम्यान या प्रकरणात गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील करणार असल्याचे समजते.
या प्रकरणाची हकीगत अशी कि, तेल्हारा तालुक्यातील ग्राम मालपुरा येथील सुखदेव चऱ्हाटे यांना दोन मुले व चार मुली अशी सहा अपत्ये होती. त्यातील एक मुलगी सौ. द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे राहणार राहुल नगर आकोट हिने वडिलांकडे वारसा हक्काने आपल्याला शेती देण्याची मागणी केली.
त्यावर सुखदेव चऱ्हाटे यांनी मुलीला दोन एकर शेती वहीती करिता दिली. त्यावर बाबुराव व धनराज या दोन भावांनी आक्षेप घेतला. त्यामुळे सदर प्रकरण तेल्हारा न्यायालयात न्यायप्रविष्ठ करण्यात आले.
न्यायालयात हा वाद सुरू असतानाच द्वारकाबाईने आपले पती हरिभाऊ ह्याचे सोबतीने त्या शेतात पेरणी केली. परंतु दोन्ही भावांनी पेरणी करण्यास मनाई केली. त्यावरून भावा-बहिणींमध्ये दि.२८.६.२०१५ रोजी शेतातच वाद झाला.
त्यानंतर सारी मंडळी गावात परतली. त्या ठिकाणी द्वारकाबाईने आपल्या दोन मुलांना निरोप पाठवून आकोट येथून मालपुरा येथे बोलावले. त्यानुसार द्वारकाबाईची दोन मुले श्याम वय २४ वर्षे व मंगेश वय १७ वर्षे हे घटनास्थळी आले.
ते आल्यावर गावात पुन्हा ह्या भाव बहिणींचा वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी द्वारकाबाई व तिचे मुलांनी बाबुराव व धनराज यांचे वर विळा, चाकू व कोयत्याने हल्ला चढविला.
त्यावेळी धनराज ची दोन मुले गौरव वय २१ वर्षे व शुभम वय १९ वर्षे ही मध्ये आली. परंतु क्रोध अनावर झाल्याने द्वारकाबाई, तिचा पती व तिच्या दोन मुलांनी बाबुराव, धनराज, गौरव व शुभम यांचे वर सशस्त्र हल्ला करून त्यांना जीवनातून संपविले.
याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी हरिभाऊ राजाराम तेलगोटे वय ६० वर्षे, सौ. द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे वय ५० वर्षे, श्याम उर्फ कुंदन हरिभाऊ तेलगोटे वय २४ वर्षे व मंगेश हरिभाऊ तेलगोटे वय १७ वर्षे यांचे विरोधात भादवि कलम ३०२,३४ अन्वये अपराध दर्ज केला.
त्यानंतर प्रकरण आकोट जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी सरकारी वकील जी. एल. इंगोले यांनी तब्बल २१ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. त्यावेळी आरोपीचे वकील सत्यनारायण जोशी यांनी आरोपींची बाजू मांडली.
ही सारी पडताळणी, तपासणी व युक्तिवाद पूर्ण झाल्यावर आकोट जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी सदर प्रकरणात आरोपींवर गुन्हा सिद्ध झाल्याचा निर्वाळा दिला. त्यावर सरकारी वकील जी. एल. इंगोले यांनी फैसल्या करिता वेळ मागून घेतला.
त्यांची विनंती मान्य करून न्यायालयाने आपला फैसला राखून ठेवला असून दि.३ मे रोजी हा फैसला सुनावण्यात येणार आहे. हा फैसला द्वारकाबाई, तिचा पती व मुलगा श्याम यांचे बाबत होणार आहे. यातील एक आरोपी मंगेश हा हत्येच्या वेळी १७ वर्षे वर्षांचा अर्थात अल्पवयीन असल्याने त्याचा खटला अकोला येथे बाल न्यायालयात सुरू आहे.
आकोट न्यायालयाने दिलेला फैसला अकोला बाल न्यायालयात दाखल केल्यावर तिथे मंगेश बाबत फैसला देण्यात येणार आहे. यादरम्यान सरकारी वकील जी. एल. इंगोले हे या प्रकरणात गुन्हेगारांकरिता फाशीच्या शिक्षेची मागणी करणार असल्याचे समजते. त्यामुळे याप्रकरणी नेमका काय फैसला येतो याची उत्सुकता लागलेली आहे.