रामटेक – राजु कापसे
रामटेक:- नुकतेच भिल्लेवाडा येथे वाघाच्या हल्ल्यात एक बैल ठार तर दोन गायी जखमी केल्यानंतर पुन्हा त्याच वाघाने भोंदेवाडा येथे शेतात चरणाऱ्या गाय-वासरावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी दुपारी ११ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, पवनी वनपरिक्षेत्र हद्दीत येणाऱ्या भोंदेवाडा बिट क्रमांक २७२ मधील मौजा भोंदेवाडा येथे पारस प्रमोद अग्रवाल यांची शेती आहे.दि.२९ ऑगस्टला दुपारी ११ वाजताच्या सुमारास शेतात जनावरे मोकाट चरत असतांना अचानक वाघाने वासरावर हल्ला केला.वासराच्या चपळाईने वाघाच्या तावडीतून वासराची सुटका झाली.मात्र वाघाने गाईवर हल्ला चढविला.मात्र गायसुद्धा वाघाच्या तावडीतून सुटण्यास यशस्वी झाली मात्र यात ती गाय गंभीर जखमी झाली.
घटनेची माहिती वनविभागाला व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. वनविभाग व पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहचले व पंचनामा करून जखमी गाय-वासराचा उपचार करण्यात आले. जखमी झालेल्या गाय-वासराच्या उपचाराचा संपूर्ण खर्च वनविभाग करणार असल्याची माहिती आहे.
लागोपाठ परिसरात होणाऱ्या वाघाच्या हल्ल्याने संपूर्ण परिसर भयभीत झाले असून भीतीपोटी शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे.या वाघाचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
“जखमी झालेल्या गायी-वासरावर उपचार सुरू आहेत.वासराला किरकोळ जखम असून गाय गंभीर जखमी आहे. सुरुवातीपासूनच आम्ही गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात असून गायीचे उपचार सुरू आहे.मात्र गाय वाचण्याची शक्यता फार कमी असल्याचे दिसून येते.”