राज्यात तीन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतरच आंदोलनाला हिंसक वळण लागले तर मराठा आंदोलकांनी राज्यात ठिकठिकाणी निदर्शने सुरू केली आहेत. अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन केला जात आहे. काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर विरोधकही आक्रमक झाले आहेत. विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. यावर राज्य सरकार कडून जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना आज रविवारी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागले. यामध्ये पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. दगडफेकीमुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, असा दावा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अनेक विरोधी नेत्यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सत्तेत आल्यावर २४ तासात आरक्षण देण्याच्या वल्गणा देवेंद्र फडणवीस यांनीच केल्या होत्या. धनगर समाजाला आरक्षण देतो, मराठा समाजाला आरक्षण देतो अशी आश्वासने फडणवीस यांनीच दिली होती मग आता काय झाले, सत्तेत येऊन वर्ष झाले अजून का आरक्षण दिले नाही. असे प्रश्न विरोधक विचारत आहे.
काय प्रकरण आहे?
२९ ऑगस्टपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील या कार्यकर्त्याने काही सहकाऱ्यांसह जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटे गावात उपोषण सुरु केलं होतं. आंदोलन सुरु असताना मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आली. मात्र त्यांनी उपोषण मागे घेतलं नाही. त्यानंतर आज पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला. लहान मुलं, महिला कुणालाही पाहिलं नाही. प्रचंड लाठीचार्ज केल्यानंतर आम्ही शांत का बसायचं असं मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे. एवढंच नाही पोलिसांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.