महाराष्ट्राच्या राजकारणातील गेल्या दोन दिवसात मोठ्या घडामोडी बघायला मिळाल्या. देशातील मोठे नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज बुधवारी अजित पवार यांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार याच्या चर्चा रंगत असताना ही बैठक होत आहे.
मंगळवारी शरद पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. मात्र, सक्रिय राजकारणात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र शरद पवार यांचा राजीनामा ज्याप्रकारे अचानक घडला त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी शरद पवार यांनी राजीनामा जाहीर केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांची एक समिती स्थापन केली जाईल, जी पुढील अध्यक्षाची निवड करेल, असेही ते म्हणाले.
शरद पवारांची जागा कोण घेऊ शकते?
शरद पवार किंवा राष्ट्रवादीने नव्या अध्यक्षाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही मात्र सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार शरद पवारांची जागा घेऊ शकतात. शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षनेते जयंत पाटील हेही शर्यतीत आहेत. शरद पवार यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणीही पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत. मात्र शरद पवार हे त्यांनी घेतलेल्या निर्णयावर ठाम असल्याचे सूत्राकडून समजते. आता अजित पवार यांच्या घरी होत असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांच्या राजीनाम्याची वेळही खूप महत्त्वाची आहे. खरे तर उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय येत्या दोन आठवड्यात निकाल देऊ शकते. या याचिकेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अन्य १५ आमदारांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशा स्थितीत अजित पवार भाजपसोबत युती करतील, अशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत. त्यामुळेच शरद पवार यांच्या अचानक राजीनाम्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार यांचा राजीनामा हा महाविकास आघाडी आघाडीसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.