पातुर तालुक्यातील घटना, आरोपी जेरबंद…
पातुर – निशांत गवई
कल्याण व पुणे येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण राज्यभरात खळबळ निर्माण झालेली असतांनाच व या दोन्ही घटना ताज्या असतांना गुरुवारी अकोला जिल्ह्यात सुद्धा अशीच खळबळ जनक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावात नऊ वर्षीय मुलीवर पन्नास वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
याबाबत प्राप्त माहिती अशी की गुरुवार दि. 26 डिसेंबर रोजी सायंकाळी पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत तालुक्यातील एका गावातील नऊ वर्षीय मुलगी आपल्या घराजवळ बकरीच्या पिल्लांसोबत खेळत होती. बकरीचे पिल्लू धावत एका घरामध्ये शिरले. त्या बकरीच्या पिल्लाला परत आणण्यासाठी ही चिमुकली त्या घरामध्ये गेली असता घरात पन्नास वर्षीय इसम हजर होता. बाकी कोणीही घरात नव्हते. त्यामुळे या नराधमाने या चिमुकलीला पकडून तिच्यावर अत्याचार केला.
थोड्या वेळाने ही चिमुकली घरी पोहोचल्यानंतर तिला वेदना व्हायला लागल्या. तेव्हा तिने तिच्या आईला ही बाब सांगितली. आईने विचारपूस केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. कुटुंबीयांनी लगेच पातूर पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना सर्व हकीकत सांगितली.
पातुर पोलिसांनी लगेच आरोपीला पकडण्यासाठी सूत्र हलविले परंतु तोपर्यंत आरोपी गावातून पसार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन गावापासून जवळच असलेल्या जंगलातून त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.
कल्याण आणि पुणे येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतांनाच अकोल्यात सुद्धा अशीच अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना समोर आल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कल्याण, पुणे व अकोला या तीनही ठिकाणी घडलेल्या घटना ह्या चिमुकल्यांच्या राहत्या घराच्या जवळ घडलेल्या आहेत. त्यामुळे आता मुलींनी घराच्या बाहेर सुद्धा पडायचे नाही काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावामध्ये चिमूरडीवर झालेल्या अत्याचार संदर्भात तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेण्यात आली आहे आरोपीला अटक कारवाई करून शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येईल
हणमंत डोपेवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक पो स्टे पातूर