अकोला – संतोषकुमार गवई
कृषी निविष्ठांचा कुठेही काळा बाजार होऊ नये यासाठी पथकांनी काटेकोर तपासण्या व कुठेही अनियमितता आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.
कृषी निविष्ठा, खते, बियाणे यांच्या वितरणाबाबत बैठक जिल्हाधिका-यांच्या दालनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी शंकर किरवे, कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ, मोहिम अधिकारी महेंद्र साल्के आदी दालनात व सर्व तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
प्रत्येक विक्री केंद्रावर कर्मचा-यांचे फोन नंबर प्रदर्शित करा जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथकांनी कृषी केंद्रांची तपासणी करून अनियमितता आढळलेल्या केंद्रावर कारवाईचे प्रस्ताव सादर करावेत. आतापर्यंत अनियमितता आढळल्याने 57 कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे परवान्यांबाबत कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. केंद्रांवर पथकांनी सातत्याने देखरेख ठेवावी. जिल्हा व तालुका स्तरावर संनियंत्रण व तक्रार कक्षातील कर्मचा-यांचे मोबाईल क्रमांक प्रत्येक विक्री केंद्रावर प्रदर्शित करावे,
निविष्ठांचा पुरेसा साठा उपलब्ध जिल्ह्यात युरिया या रासायनिक खताचा 7 हजार 254 मे. टन साठा मंगळवारी सायंकाळपर्यंत शिल्लक होता. त्याचप्रमाणे, आज 1 हजार 500 मे. टन आज उपलब्ध झाला आहे. डीएपी खताचा मंगळवारी सायंकाळपर्यंत 1 हजार 200 मे. _न उपलब्ध आहे. शनिवारपर्यंत 2 हजार 400 मे. टन साठा उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यात संयुक्त खताचा 25 हजार 126 मे. टन, एसएसपी खताचा 12 हजार 750 मे. टन एवढा खतसाठा उपलब्ध आहे. हा साठा पाहता खरीप हंगामात खतांचा तुटवडा भासणार नाही. विक्री केंद्रात खते, बियाणे या निविष्ठांचा उपलब्ध साठा फलकावर रोज अद्ययावत करून प्रदर्शित करावा. गरजेनुसार जिल्ह्यात सर्वदूर खतांचे वितरण व्हावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
जिल्ह्याला आवश्यक असलेल्या कापूस बियाण्याचा 6 लाख पाकिटांचा पुरवठा झाला आहे, तसेच सोयाबीन पिकाच्या विविध वाणांचा आवश्यकतेनुसार पुरवठा झाला आहे. शेतक-यांनी घरचे बियाणे वापरून पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे यावेळी करण्यात आले.