Saturday, July 13, 2024
spot_img
Homeराज्यराहुल गांधीं वरील कारवाई राजकीय द्वेषातून, सर्वोच्च न्यायालयात जाऊ : नाना पटोले...

राहुल गांधीं वरील कारवाई राजकीय द्वेषातून, सर्वोच्च न्यायालयात जाऊ : नाना पटोले…

ललित मोदी, निरव मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कोण लागतात?

मोदी सरकारविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक्र, राज्यभर तीव्र आंदोलन.

नरेंद्र मोदींच्या तानाशाहीपुढे काँग्रेस कधीही झुकणार नाही :- नसीम खान

ठाण्यात पटोलेंच्या नेतृत्वाखाली तर मुंबईत विलेपार्ले भागात नसीम खान यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन.

मुंबई – राहुल गांधी यांच्याविरोधात खोटी तक्रार करुन राजकीय द्वेषातून जाणीवपूर्वक कारवाई केलेली आहे. राहुल गांधी यांनी कोणत्याही समाजाचा अपमान केलेला नाही परंतु राहुल गांधी यांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजपा गलिच्छ राजकारणातून करत आहे.

देशातील कायदे सर्वांना समान आहेत व काँग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देता येत नाही परंतु राजकीय द्वेषातून राहुलजींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर राज्यभरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरले व हुकुमशाही मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. ठाणे येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी भाजपा व मोदी सरकारवर तोफ डागली. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांच्यावरील कारवाई ही राजकीय द्वेषातून करण्यात आलेली असून त्यामागे कोणती शक्ती आहे हे सर्वांना माहित आहे.

राहुल गांधी यांची याचिका गुजरात हाय कोर्टाने फेटाळली आहे परंतु याविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात दाद मागेल. ही लढाई मोठी आहे आणि देशातील हुकुमशाही विरोधात काँग्रेस लढत आहे. राहुल गांधी यांनी भ्रष्ट निरव मोदी, ललित मोदी यांच्याविरोधात टीका केली होती. भ्रष्ट लोकांवर टीका केली तर ती एखाद्या जातीविरोधात कशी होऊ शकते?

निरव मोदी, ललित मोदी यांनी जनतेचे कोट्यवधी रुपये लुटून परदेशात पळून गेले, हे मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोण लागतात, त्यावर नरेंद्र मोदी बोलत का नाहीत? त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत?

मोदी सरकार घाबरलेले असून सत्तेपासून दूर जात असल्याच्या भितीपोटी कारवाई केली आहे. भाजपाची ही कृती लोकशाहीचा गळा घोटणारी तसेच लोकशाहीला कलंक लावणारी आहे.

तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम द्रुतगती मार्गावर विलेपार्ले येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रास्ता रोको आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध केला.

यावेळी उत्तर मध्य जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जगदीश अमीन, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनिशा बागुल यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना नसीम खान म्हणाले मोदी सरकार राहुल गांधींना घाबरले आहे म्हणून त्यांचा आवाज दडपण्यासाठी त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करत आहे.

पण राहुल गांधी या असल्या दडपशाहीला घाबरणार नाहीत आम्ही सर्वजण देशातील कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

मुंबईतील दहिसर भागात माजी मंत्री अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले तसेच राज्याच्या विविध भागातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मोदी सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: