आकोट – संजय आठवले
पतीचा निर्घृण खून करून त्या खुनाचा पुरावा नष्ट करणारी पत्नी श्रीमती मंगला रमेश हागे, रा. संभाजी चौक, जुने शहर, तेल्हारा, जि. अकोला हिला आज दि. ०९/१२ /२०२२ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बाविस्कर यांनी भा.दं.वि चे कलम ३०२ कलमांतर्गत शिक्षापात्र गुन्हयांसाठी जन्मठेपेची व १५,०००/- रू द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे. द्रव्यदंड न भरल्यास ०३ वर्षांचा अधिकच्या कारावासाची शिक्षा भोगावयाची आहे.
यासोबतच भा. दं.वि. च्या कलम २०१ या कलमांतर्गत ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची व ३००० /- रू द्रव्यदंडाचीही तिला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. द्रव्यदंड न भरल्यास ६ महिन्यांचा अधिकच्या कारावासाची शिक्षा भोगावयाची आहे. द्रव्यदंड न भरल्यास असणाऱ्या वैकल्पिक कारावासाच्या शिक्षा आरोपीने स्वतंत्र स्वतंत्र म्हणजे एका गुन्हयासाठी द्रव्यदंड न भरल्यास भोगावयाच्या वैकल्पिक शिक्षेच्या समाप्तीनंतर दुसऱ्या गुन्हयासाठीचा द्रव्यदंड न भरल्याची वैकल्पिक शिक्षा, अशी एकानंतर दुसरी, अशा रीतीने भोगावयाच्या आहेत.
या प्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी आहे कि श्रीमती मंगला रमेश हागे रा. संभाजी चौक, जुने शहर, तेल्हारा हिचा पती रमेश ओंकार हागे वय ५० वर्ष हा तीचे चारीत्र्यावर संशय घेवून तीला नेहमीच त्रास देत होता. त्याचे त्रासाने ती कंटाळून गेली होती. त्यामूळे दि. १०.०३.२०१९ चे रात्री १.०० ते १.३०चे सुमारास रमेश घरात झोपलेला होता. ही संधी साधून मंगलाने त्याच्या डोक्यावर लोखंडी मुसळाने गंभीर वार करून त्याला ठार केले.
नंतर त्याच्या प्रेतावर लाकडी ईंधन व रॉकेल टाकून प्रेत पेटवून दिले. घरामध्ये सांडलेले रमेश चे रक्त तिने शेजारील नारायण हागे यांचे घरातील हौदातून पाणी आणून धुऊन काढले. सोबतच रमेशच्या प्रेतावरही पाणी टाकून ते विझविले. पतीचा असा मृत्यू झाल्याने पोलीस चौकशी करतील असा धाक मंगलाला वाटला. त्यामुळे या हत्या रमेशने स्वतःहून केलेली आत्महत्या असल्याचा आभास निर्माण केला. त्याकरता तिने घरातील रजिस्टरचे पानावर तिच्या हाताने चिठठी लिहून त्याच्या प्रेताजवळ ठेवून दिली.
आणि शेजारच्या नारायण हागे यांचे घरी यापूर्वीच झोपलेल्या आपल्या मुली जवळ जावून झोपी गेली. अशाप्रकारे पुरावा नष्ट करण्याचा हा प्रकार पोलीस तपासामध्ये उघड झाला. त्या आधारे सरकारतर्फे फिर्यादी पो.उप.नि. सुधाकर गवारगुरू यांनी पो.स्टे. तेल्हारा येथे फिर्याद नोंदविली.त्यावरून मंगलावर कलम ३०२, २०१ भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा क्र.७५/१९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरील दोषारोपपत्राची न्यायालयाने दखल घेवून आरोपी मंगला रमेश हागे विरूध्द वरील प्रमाणे दोषारोपण करून न्यायालयात खटला चालविला. आरोपीविरूध्द गुन्हा सिध्द करण्याकरिता सरकारपक्षांच्या वतीने सरकारी वकील अजित वि. देशमुख यांनी एकूण १३ साक्षीदारांच्या साक्षी घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने आरोपी मंगला हिचा एकुलता एक मुलगा व मुलगी यांची देखील साक्ष नोंदविण्यात आली. सरकारपक्षांचा व आरोपीच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकून वि. न्यायालयाने आरोपीला दोषी धरून वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.
वरील प्रकरणामध्ये सरकारपक्षांच्या वतीने अजित वि. देशमुख, सहाय्यक सरकारी अभियोक्ता, आकोट यांनी न्यायालयासमक्ष प्रकरणात बाजू मांडली व युक्तिवाद केला की, ‘सदर प्रकरणामध्ये परिस्थितीजन्य पुराव्याच्या साखळया जुळलेल्या आहेत. त्यामुळे मनुष्य खोटा बोलू शकतो, पण परिस्थिती नाही. तसेच हस्ताक्षर तज्ज्ञाचा अहवालही या प्रकरणात दाखल आहे. तो देखील या प्रकरणात महत्वाचा पुरावा आहे.
सोबतच या प्रकरणात भरपूर परिस्थितीजन्य व कागदोपत्री पुरावे उपलब्ध असल्याने आरोपीला खुन करून पुरावा नष्ट केल्याबद्ल कठोर शिक्षा देण्यात यावी. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर विद्यमान जिल्हा सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी आरोपीला वरील प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
वरील प्रकरणाचा तपास पो.उप.नि. निलेश देशमुख व पी. एस. आय. गवारगुरू यानी केला. पोलीस हे. कॉ. रामेश्वर राउत पो.स्टे. तेल्हारा ब.नं.१८८७ यांनी पैरवी म्हणून तेल्हारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्य केले.