आकोट – संजय आठवले
सद्यस्थितीत आकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रलंबित प्रकरणांमधील निवाडे देण्याचा धडाका लावला असून आज एका आरोपीस तब्बल दहा वर्षे सक्त मजुरी व एकूण २२ हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील प्राधान्य कारावासाच्या शिक्षा आरोपीने एकत्रितपणे तर द्रव्य दंड न भरल्यास भोगावयाच्या अधिकच्या कारावासाच्या शिक्षा एकानंतर एक अशा रीतीने भोगावयाचे आहेत.
या घटनेची हकिगत अशी कि, आकोट शहरातील खानापूर वेस परिसरात धनराज तेलगोटे याचे पान ठेल्यासमोर दि.२७.१०.२०१९ रोजी काही युवक उभे होते. त्या ठिकाणी विकी उर्फ सतीष विलास तेलगोटे हा २३ वर्षीय युवक आला. तेथे पाणी पिऊन त्याने बाजूला उभ्या असलेल्या सफल शिलानंद तेलगोटे याचे अंगावर गुळणी टाकली. नंतर त्यालाच शिवीगाळ करून त्याची मानगुट पकडली. हे दृष्य पाहून शेजारीच उभा असलेला सफलचा मित्र रोहित देवेंद्र मोरे याने विकिचा हात झटकून सफलची बाजू घेतली. त्यावर रागाचा पारा चढलेल्या विकिने हातातील भाल्याचे पाते रोहितच्या डाव्या बाजूकडील बरगडीत खूपसले. त्या वाराने रोहितचा मृत्यू झाला. अशा आशयाची फिर्याद रोहितचा पिता देवेंद्र नारायण मोरे याने आकोट शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.
पोलिसांनी याप्रकरणी भादवी ३०२, ३२३,२९४ व शस्त्र बंदी कायदा १९५९ अन्वये गुन्हा दाखल केला. ह्या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. त्यावर आकोट जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली. या सुनावणीमध्ये विकिने केलेल्या वाराने रोहितचा मृत्यू झाला. परंतु त्याला ठार करण्याचा विकीचा हेतू नसल्याचे समोर आले. त्यामुळे न्यायालयाचे संमतीने प्रकरणातील भादवी ३०२ हे कलम कमी करण्यात येऊन त्या ठिकाणी भादवि कलम ३०४(२) हे लागू करण्यात आले.
त्या पुढील सुनावणी मध्ये या प्रकरणात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. यावेळी सरकारी वकील श्रीमती वंदना भीमराव सहारे यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला. आपल्या युक्तिवादात त्यांनी न्यायालयास सांगितले कि, आरोपीने रोहितवर भाल्याच्या पात्याने हल्ला चढविला. म्हणजे आरोपी हा बेकायदेशीरपणे भाल्याचे पाते सतत स्वतःजवळ बाळगीत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच रोहित आपल्या प्राणास मुकला आहे. त्याकरिता आरोपीस शिक्षा देण्यात दया दाखविल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. त्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी सरकार व आरोपीच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकून घेतले. आणि आरोपी याचे विरुद्ध भादवि कलम ३०२, ३२३, २९४ व शस्त्र बंदी कायदा सह कलम ४,२५ अन्वये गुन्हा सिद्ध झाल्याचा निवाडा दिला.
त्यानंतर न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी आरोपीस कलम ३०४(२) अन्वये दहा वर्षे सश्रम कारावास व रुपये १५,००० द्रव्य दंड, कलम ३२३ अन्वये सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये द्रव्य दंड, कलम २९४ अन्वये तीन महिने साधा कारावास व एक हजार रुपये द्रव्य दंड आणि अवैधपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी शस्त्र अधिनियम १०५९ चे कलम ४,२५ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये द्रव्य दंडाच्या शिक्षा निश्चित केल्या. द्रव्य दंडाची ही रक्कम सरकार जमा न केल्यास ह्या कलमान्वये आरोपीस एकूण एक वर्ष साडेदहा महिने अधिकचा कारावास भोगावयाचा आहे. याप्रकरणी पैरविकार म्हणून पोहेकाॅं प्रकाश वसंतराव जोशी यांनी कामकाज केले.